
टीएमसीचे नेते अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून पक्षाच्या २० गद्दार खासदारांविरोधातील अपात्रतेच्या याचिकांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याची मागणी केली आहे. या गद्दार खासदारांनी नुकताच नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) या पक्षात विलीनीकरण केल्याचा दावा करत संसदेत स्वतंत्र गटाची मान्यता मागितली होती. या बेकायदेशीर विलीनीकरणाला आक्षेप घेत अभिषेक बॅनर्जी यांनी थेट लोकसभा अध्यक्षांकडे धाव घेतली आहे. ANI ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
अभिषेक बॅनर्जी यांनी पक्षांतर बंदी कायद्याच्या (दहाव्या अनुसूचीच्या) उल्लंघनाचा हवाला देत लोकसभा अध्यक्षांकडे २० स्वतंत्र अपात्रतेच्या याचिका दाखल केल्या आहेत. लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात आणि भेटीदरम्यान बॅनर्जी यांनी स्पष्ट केले की, घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार कोणताही खासदार स्वेच्छेने मूळ पक्षाचे सदस्यत्व सोडत असेल किंवा दुसऱ्या पक्षात सामील होत असेल, तर तो संसदेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरतो. केवळ विधिमंडळ किंवा संसदीय पक्षाच्या काही सदस्यांनी मिळून दुसऱ्या पक्षात विलीनीकरण करणे कायदेशीर ठरत नाही, तर त्यासाठी मूळ राजकीय पक्षाच्या दोन-तृतीयांश सदस्यांचे विलीनीकरण होणे आवश्यक असते, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निकालांचा दाखला देत, या अपात्रतेच्या याचिकांवर लवकरात लवकर निर्णय घेण्याची विनंती त्यांनी केली आहे.
या गद्दार खासदारांवर जोरदार टीका करताना अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांना थेट राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवण्याचे खुले आव्हान दिले आहे. जर या खासदारांमध्ये थोडा जरी प्रामाणिकपणा शिल्लक असेल, तर त्यांनी आधी राजीनामा द्यावा आणि नंतर कोणत्याही पक्षाच्या तिकिटावर जनतेच्या न्यायालयात जाऊन निवडणूक लढवून दाखवावी, असे ते म्हणाले.



























































