
प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वाराणसीत एक संतप्त घटना उघडकीस आली आहे. नर्सरीत शिकणाऱ्या लहान मुलाने पॅन्टमध्ये लघवी केली म्हणून संतप्त शिक्षिकेने गरम चाकूने त्याच्या गुप्तांगाला चटके दिले. याप्रकरणी शिक्षिका, शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, वाराणसीतील पांडेपूर येथील एका खाजगी शाळेत ही घटना घडली. वकील केसरी जयस्वाल यांचा पाच वर्षांचा मुलगा 24 जुलै रोजी नेहमीप्रमाणे शाळेत गेला होता. घरी परतल्यावर त्याने आपल्या गुप्तांगात दुखत असल्याची तक्रार केली. आईने पाहिले असता त्याच्या गुप्तांगावर फोड आलेले आढळले. याबाबत मुलाकडे विचारणा केली असता शाळेत घडला प्रकार आईला सांगितले.
मुलाने दिलेल्या माहितीनुसार, मुलाने शिक्षिका प्रीती कुशवाहा हिच्याकडे बाथरूममध्ये जाण्याची परवानगी मागितली होती, पण ती नाकारण्यात आली. त्यानंतर मुलाने पॅन्टमध्येच लघवी केली. यामुळे शिक्षिका संतापल्या आणि त्यांनी त्याला दुसऱ्या खोलीत नेऊन गॅस स्टोव्हवर चाकू गरम करून त्याने गुप्तांगाला चटके दिले.
जयस्वाल यांनी 25 जुलै रोजी आपल्या पत्नी आणि मुलासह शाळेत जात मुख्याध्यापक व व्यवस्थापनाकडे तक्रार केली. मात्र शाळेने कारवाई करण्याऐवजी तुम्हाला जे करायचे आहे ते करा असे सांगितले, असा दावा जयस्वाल यांनी केला. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी शिक्षिका प्रीती कुशवाहा, शाळा व्यवस्थापन आणि मुख्याध्यापक यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 115(2), 118(1) आणि 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.


























































