
छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या आरमारासाठी महत्त्वाचे योगदान दिलेला ऐतिहासिक ‘गोपाळगड’ आता अतिक्रमणांतून मुक्त होणार आहे. पुरातत्व विभागाने या किल्ल्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. पर्यटक आणि गडप्रेमींनी राज्य शासनाच्या या पावलाचे स्वागत केले आहे.
गुहागर तालुक्यात दाभोळ खाडीलगत असलेल्या गोपाळगडाच्या जागेवर खासगी मालकी हक्क सांगितला जात होता. त्यामुळे या गडावर जाणारे पर्यटक आणि शिवप्रेमींची अडवणूक होत होती. अनेकदा त्यावरून वादही झाले होते. त्या तक्रारींची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली. पुरातत्व विभागाने या किल्ल्याच्या भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानंतर हा गड पूर्णपणे शासनाच्या ताब्यात येणार आहे.
शिवरायांच्या आरमारी व्यवस्थेत गोपाळगडाचे वेगळेच महत्त्व होते. दाभोळ खाडी आणि परिसरातील सागरी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्याचा त्या काळात वापर होत होता. हजारो इतिहासप्रेमी इतिहासाच्या या साक्षीदाराला भेट देत असतात, मात्र किल्ल्याच्या आतील एका भूखंडावर खासगी हक्क सांगितला गेल्याने वाद निर्माण झाला होता. गेल्या मे महिन्यात या जलदुर्गावर आलेल्या पर्यटकांनी आंब्याच्या एका झाडावरून पडलेले दोन आंबे उचलल्याने त्यांना खासगी हक्क सांगणाऱ्या लोकांनी दमदाटी करून डांबून ठेवल्याची घटना घडली होती.

























































