
नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनानंतर दिल्लीसह भाजपशासित अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केले जात आहेत. विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेण्यापूर्वी सरकारने त्यांच्या 3 अटी मान्य केल्या होत्या. त्यापैकीच एक विद्यार्थ्यांवरील FIR संबंधीत होती. मात्र सरकारने दिलेला शब्द न पाळल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. आंदोलकांवर कोणतीही कारवाई करणार नाही, असे आश्वासन देऊन अवघ्या दोन दिवसांतच भाजपने त्याची होळी केली, अशी टीका रोहित पवार यांनी केली.
रोहित पवार यांनी X वर पोस्ट शेअर करत मोदी सरकारवर धारेवर धरले. विद्यार्थी आणि तरुणांनी प्रथमच भाजपला गुडघे टेकायला भाग पाडल्यामुळे त्यांचा अहंकार चांगलाच दुखावला गेला आहे. याच दुखावलेल्या अहंकारापोटी आणि घायाळ मानसिकतेतून भाजपने ‘कोणत्याही आंदोलक विद्यार्थ्यावर कारवाई केली जाणार नाही, या स्वत:च्या आश्वासनांची दोन दिवसात होळी केली. एवढेच नाही तर भाजपशासित बिहार, प. बंगाल, आसाम आदी राज्यांमध्ये विद्यार्थी आणि तरुणांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा सपाटा लावल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला.
विद्यार्थी आणि तरुणांनी प्रथमच गुडघे टेकायला भाग पाडल्यामुळं भाजपचा अहंकार चांगलाच दुखावल्याचं दिसतंय. त्यामुळंच घायाळ झालेल्या भाजपाने ‘कोणत्याही आंदोलक विद्यार्थ्यावर कारवाई करणार नाही’ या स्वतःच्याच आश्वासनाची दोनच दिवसांत होळी केली आणि भाजपशासित बिहार, प. बंगाल, आसाम आदी…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 28, 2026
सरकारच्या या भूमिकेतून ‘लबाडी, फसवणूक आणि विश्वासघात’ हाच आपला खरा DNA आहे, हे पुन्हा भाजपने सिद्ध झाले आहे. सरकारच्या या भूमिकेचा निषेध करताना रोहित पवार म्हणाले की, भाजप सरकारच्या या लबाडीचा आणि दडपशाहीचा योग्य वेळी इंच इंच हिशोब घेतल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत सरकारच्या या धोरणाविरोधात रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे.





























































