स्पायडर-मॅनची भूमिका ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट- टॉम हॉलंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हॉलीवूड अभिनेता टॉम हॉलंड पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला स्पायडर-मॅनच्या भूमिकेत येणार आहे. Spider-Man: Brand New Day या चित्रपटातून तो चौथ्यांदा पीटर पार्करची भूमिका साकारणार असून, या भूमिकेबद्दल बोलताना त्याने ती आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट असल्याचे म्हटले आहे. ‘ब्रँड न्यू डे’ची कथा Spider-Man: No Way Home या चित्रपटाच्या चार वर्षांनंतरची आहे. ‘नो वे होम’च्या शेवटी पीटर पार्करने डाॅक्टर स्ट्रेंज याला विनंती करून स्वतःची स्पायडर-मॅन म्हणून असलेली ओळख जगाच्या स्मृतीतून पुसून टाकण्यास सांगितले होते. त्यामुळे त्याची प्रेयसी एमजे आणि जिवलग मित्र नेड यांनाही त्याची ओळख विसरावी लागली होती. यानंतर पीटर पार्करचे आयुष्य कोणते नवे वळण घेते, याची कथा ‘ब्रँड न्यू डे’मध्ये पाहायला मिळणार आहे.

टॉम हॉलंड याने ‘हॉलिवूड रिपोर्टर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “मार्वल आणि सोनीमध्ये आम्ही एका कुटुंबाप्रमाणे काम करतो. गेली दहा वर्षे आम्ही एकत्र चित्रपट बनवत आहोत. आमच्यात उत्तम समन्वय आहे आणि ‘पीटर पार्कर’ या पात्रावर सर्वांचेच समान प्रेम आहे. आम्ही एकत्र आलो की काहीतरी जादू घडते. ही भूमिका पुन्हा पुन्हा साकारण्याची संधी मिळते, यावर आजही माझा विश्वास बसत नाही. प्रत्येक वेळी या पात्राचा प्रीमियर हा माझ्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठ्या भेटीप्रमाणेच असतो.”

स्पायडर-मॅनच्या भूमिकेतील भविष्यासंदर्भात विचारले असता हॉलंड म्हणाला, “जोपर्यंत मला ही भूमिका करण्याची संधी मिळेल, तोपर्यंत मी ती साकारत राहीन. हा चित्रपट यशस्वी ठरला, तर पुढे काय होते ते पाहू.”

मार्वल चाहत्यांमध्ये ‘स्पायडर-मॅन: ब्रँड न्यू डे’बद्दल मोठी उत्सुकता असून, हा चित्रपट वर्षातील सर्वाधिक चर्चेत राहणाऱ्या आणि मोठ्या कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.