युक्रेनजवळील जहाजावर १३ हिंदुस्थानी खलाशी अडकले, ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे धोका कायम- रिपोर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
13-indian-sailors-trapped-on-cargo-ship-in-ukraine-chornomorsk-port-drone-missile-strikes

युक्रेनमधील चोर्नोमोर्स्क बंदरात उभ्या असलेल्या मालवाहू जहाजावरील १५ कर्मचाऱ्यांपैकी किमान १३ हिंदुस्थानी खलाशी अडकले आहेत. काळ्या समुद्रालगतच्या या बंदराच्या परिसरात ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले सुरूच असल्याची माहिती फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया (एफएसयूआय)ने दिली आहे. या अडकलेल्या कर्मचाऱ्यांवर ‘अत्यंत भीषण आणि जीवघेणी परिस्थिती’ ओढवली असून, रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सुरू असल्याने त्यांना ‘कोणत्याही क्षणी थेट हल्ला होण्याच्या सततच्या भीतीखाली’ जगावे लागत असल्याचा इशाराही संघटनेने दिला आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

‘युक्रेनमधील चोर्नोमोर्स्क बंदरात सध्या उभे असलेले एम.व्ही. एएमआयआर १ या जहाजावर १५ कर्मचारी आहेत. त्यामध्ये १३ हिंदुस्थानी खलाशांचा समावेश असून, ते अत्यंत भीषण आणि जीवघेण्या परिस्थितीत अडकले आहेत’, असे एफएसयूआयने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

‘जहाजाच्या अगदी जवळ वारंवार ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे कोणत्याही क्षणी जहाजावर थेट हल्ला होऊ शकतो या सततच्या भीतीखाली कर्मचारी राहत आहेत’, असेही संघटनेने म्हटले आहे. तसेच, हिंदुस्थानी सरकार, जहाजमालक, जहाजाची नोंदणी असलेल्या देशाचे प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी आणि त्यांना लवकरात लवकर मायदेशी परत आणण्याची व्यवस्था करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

‘संघर्षग्रस्त भागात हिंदुस्थानी खलाशांना लक्ष्य बनून राहू देता कामा नये. तातडीने कारवाई करा’, असेही संघटनेने म्हटले आहे.

खलाशी संघटनेने जहाजावरून चित्रित केल्याचा दावा करण्यात आलेला एक व्हिडीओही शेअर केला आहे. त्यामध्ये जहाजाच्या आजूबाजूच्या परिसरात धुराचे मोठे लोट उठताना दिसत असून, बंदरातील अस्थिर परिस्थिती अधोरेखित होत असल्याचे दिसते.

आतापर्यंत परराष्ट्र मंत्रालय किंवा संबंधित जहाज कंपनीने १३ हिंदुस्थानी खलाशी संकटात असल्याच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

काळ्या समुद्रातील वाढता धोका

युक्रेनच्या दक्षिण किनारपट्टीजवळ कार्यरत व्यापारी जहाजांवर गेल्या काही दिवसांत अशाच प्रकारच्या अनेक हल्ल्यांच्या घटना समोर आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर सोमवारी हिंदुस्थानने युक्रेनचे राजदूत ओलेक्सांद्र पोलिशचुक यांना पाचारण करून, गेल्या आठवड्यात काळ्या समुद्रातील एका व्यापारी जहाजावरील हल्ल्यात हिंदुस्थानी खलाशाचा मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत तीव्र निषेध नोंदवला होता.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, या घटनेबाबत हिंदुस्थानची गंभीर चिंता राजदूतांपर्यंत पोहोचविण्यात आली असून, व्यापारी जहाजांवरील अशा हल्ल्यांचा हिंदुस्थानने अत्यंत कठोर शब्दांत निषेध केला आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यातील नव्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एम.व्ही. ओमॉर्फी या जहाजावर युक्रेनकडून ड्रोन हल्ला झाल्याचे वृत्त आहे.