
>>अजित कवटकर<<
मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र हे आपल्या धर्मसंस्कारांचे जणू कळस होय. अशा मर्यादा पुरुषोत्तमाच्या जन्मस्थळावर उभारलेल्या त्याच्या मंदिरात चोरी, भ्रष्टाचार होणे आणि त्यावर सरकारकडून अपेक्षित कारवाई न होणे, हे लज्जास्पद व संतापजनक आहे. ज्यांच्या शासनात त्यांच्या डोळ्यांदेखत धर्मपावित्र्य मलिन होते, लुटले जाते तर ते हिंदू कसले? श्रद्धेचा व्यापार करणाऱ्या अशा मंडळींनी प्रभू श्रीरामांच्या नावाने अजिबात राजकारण करू नये. हिंदू धर्म आणि हिंदूत्वावरही बोलू नये! साधूसंतांच्या या भूमीत निदान देवधर्मावर तरी वाईट नजर पाडू नका.
जगाच्या पाठीवर असा कोण हिंदू नसेल की जो राम मंदिर निर्माण आणि त्यामागच्या इतिहासाशी अवगत नाही! राम मंदिर निर्माणासाठीच्या आंदोलनात अनेकांचे बलिदान-त्याग कामी आले. हा लढा या भारतभूमीवरील हिंदू अस्मिता व अभिमानासाठीचा संघर्ष होता. या चळवळीमागे तेव्हा जरी एखाद्या पक्ष संघटनेचा पुढाकार अधिक प्रकर्षाने दिसून आला होता असला तरी अयोध्येत राम मंदिर झालेच पाहिजे, या भावनेने देशातील बहुतांश हिंदू निरपेक्ष भावनेने त्याला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंबा देत होते. याबाबत जनभावना इतकी तीव्र होती की त्यासाठी एक सरकार पाडलं गेलं आणि दुसरं बसवलं गेलं. देव-धर्माबाबत भारतीय लोक प्रचंड भावनिक – संवेदनशील आहेत. मात्र याचाच फायदा उचलण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. निवडणुका जवळ आल्या की ‘भगवान के नाम पे मत दे दे बाबा’चा सूर आळवला जातो आणि जिंकल्यानंतर त्याच भगवानाला लुटण्याचे पाप केले जाते. हे असं करणारे जेव्हा हिंदुत्वाचे ज्ञान पाजळतात तेव्हा त्याहून हास्यास्पद अधिक काय असू शकेल? ज्यांचा वैयक्तिक स्वार्थ लोकांच्या श्रद्धेचा व्यापार करतो अशांनी धर्माचे प्रतिनिधित्व करत असल्याचे सोंग घेऊ नये. देवाच्या नावाने राजकारण करू नये. हिंदू देव-धर्माच्या गोष्टी करू नये. हिंदुत्वावर बोलू नये!
हिंदू हा धर्म, हिंदुत्व हे सांस्कृतिक जीवनशैलीचे सामाजिक दर्शन आहे, अस्मिता आहे, विचारधारा आहे. परंतु हिंदुत्ववाद एक राजकीय शस्त्र बनले आहे. हिंदू धर्म हा श्रेष्ठ आहे यात वाद नाही. ईश्वरी इच्छेतून, साधुसंतांच्या साधनेतून, ऋषीमुनींच्या तपातून, पवित्र ग्रंथांमधील ज्ञानामृतामधून, परंपरांच्या सात्त्विकतेतून, माणुसकीच्या संवेदनशीलतेतून, निसर्गाच्या शिकवणीतून, सत्य-न्याय-क्षमाशीलतेच्या आदर्शांतून आकार घेत गेलेला हिंदू धर्म हा जीवनधर्मच आहे. विश्वाने स्वीकारावा, अंगीकारावा, आचरणात आणावा इतका तो योग्य व श्रेष्ठ आहे. जसे हवेला नष्ट करता येत नाही त्याचप्रमाणे असे धर्मविचार रोखणे, संपुष्टात आणणे फार मुश्किल आहे. त्यामुळेच हिंदू धर्म आमच्यामुळेच अशा गमजा करणाऱ्या मंडळींची कीव करावी तेवढी थोडी.
धर्म हा श्रद्धा व विश्वासातून वाढतो. कुणाच्या ’राजकीय नरेटिव्ह’मुळे नव्हे. त्यामुळे हिंदू धर्माला एखाद्याच्या असण्या – नसण्याने फरक पडत नाही आणि राजकारण्यांमुळे तर मुळीच नाही. आजचे हिंदुत्वाचे गलिच्छ राजकारण पाहता ते करणारे राजकारणी किती अधिक गलिच्छ असतील हे लक्षात येते. मग हे कोणत्या अधिकाराने देवाधर्माची मत्तेदारी दाखवत असतात? धर्म जोपर्यंत केवळ साधु, संत, ऋषी, मुनीं, पुण्यात्म मानवांच्या निःस्वार्थ, सेवाभावी आश्रयात होता तोपर्यंत त्याचे सात्त्विक तेज वाढतच गेले. परंतु पुढे जेव्हापासून त्यावर राजकारणी भाष्य करू लागले तेव्हापासून त्याविषयीचा स्वच्छ समज दूषित होत गेला. निवडणुका जर धर्माच्या नावाने केल्या जाणाऱ्या राजकारणावरच लढल्या जाणार असतील, तर मग ’देवधर्म खरंच खतरे में है’ म्हणावं लागेल. आज परिस्थिती इथवर आणून ठेवली गेली आहे की, सत्तापक्षाला त्यांच्या चुकांसाठी जरी जाब विचारला तरी त्यास धर्मद्रोह, देशद्रोह ठरवला जात आहे. सत्ताधारी स्वतःला देव समजू लागले आहेत. त्यांच्या विरुद्ध बोलला जाणारा शब्द हा पाप ठरतो. सत्तेचा अमरपट्टा बनवून परिधान करण्याचे यांचे प्रयत्न आणि त्यासाठी ते जे काही करताहेत वा करतील त्याला सर्वांनी योग्यच मानले पाहिजे, यासाठीचा त्यांचा अट्टहास हा लोकशाही, संविधान, न्याय यांना कमकुवत करत आहे. धर्म-अधर्म, सत्य-असत्य, नैतिक-अनैतिक वगैरेंची परिभाषा ही सत्ताधाऱ्यांच्या सोयीनुसार बदलत आहे.
निवडणुका आल्या की जनतेला विकास दाखवायचा. निवडणुका संपल्या की तोच विकास खोदायचा आणि पाच वर्षे दुरुस्त करत बसायचा. पुढच्या निवडणुकीच्या तोंडावर तो नव्याने तयार केलेला जुना विकास लोकांना पुन्हा नवीन विकास म्हणून दाखवायचा. मोठय़ा शहरांमध्ये इतका विकास होतो आहे की शहरवासीयांना तो उपभोगायलाच मिळत नाही. सगळे रस्ते सदानकदा – वर्षानुवर्षं खोदलेले, अपूर्ण अवस्थेतच दिसतात. घाई लागल्याप्रमाणे सर्वत्र एकाच वेळी पुनर्विकासाचे प्रकल्प सुरू आहेत आणि या सगळ्या अनियोजनातून होत असलेले प्रदूषण, गर्दी, अनारोग्य हे जीवघेणे ठरत आहे. पावसात शहरं डुबताहेत. ट्रेनच्या प्रवासात खून होताहेत. वाहनांच्या गर्दीत चिरडलं गेलं नाही तर महागाई चिरडत आहे. गरीब शेतकरी रडतो आहे आणि त्याच्या श्रमाचा व्यापार करणाऱ्यांची तिजोरी फुगत आहे. परीक्षांचे पेपर फुटाहेत, विद्यार्थी आत्महत्या करताहेत. कोणी पण उठतो आणि कुणाला पण मारतो आहे. निवडणुकांत पैशाने मतं विकत घेतली जात आहेत आणि जिंकल्यानंतर स्वतःचा लिलाव करून स्वतःला विकले जात आहे. लाडका – लाडकी करत वाटले जाणारे पैसे, निवडणुका आटोपताच बंद केले जात आहेत. श्रीमंतांना जागा करण्यासाठी गरीब भूमिपुत्रांना हटवलं जात आहे. सर्वसामान्य सर्वसामान्यच राहात आहेत आणि मूठभर मात्र श्रीमंतीच्या सोन्याच्या पायऱ्या चढत आहेत. समता-सहकार्य-बंधुता हे केवळ पुस्तकांमध्ये अडकून पडले आहेत. कारण विकासाची फळं ही नेहमी काहींनाच चाखायला मिळत आहेत आणि बहुतांश जनांच्या तोंडाला केवळ त्याची पानं पुसली जात आहेत. आपला हिंदू धर्म आपल्याला दया, संवेदनशीलता, जीवदया, पर्यावरणपूरक सहअस्तित्व शिकवतो, पण इथे विकासाच्या नावाखाली वन्य जीवसृष्टीवर कुऱहाड चालवण्याचे जणू धोरणच आखले गेले आहे. वृक्षतोड, निर्वनीकरण हे यांच्या विकासाच्या व्याख्येत ’फिट बसले’ आहे. दुसरा करतो ते पाप आणि तेच पाप स्वतः केल्यावर मात्र तो ‘धर्म’ ठरवला जात आहे. हा भ्रष्टधर्म कशासाठी तर सत्तेसाठी आणि सत्ता कशासाठी तर आमच्या देवदेवतांची मंदिरं लुटण्यासाठी?
देवधर्म हा श्रद्धेचा, भावनेचा विषय आहे. तथापि कर्माला देव मानून, त्यावर श्रद्धा ठेवून – त्याचे पावित्र्य राखून प्रगती करणे हे धर्माला अपेक्षित असते. देव सर्वव्यापी व सर्वांचा असल्याकारणाने त्यावरदेखील कोणी स्वतःचा किंवा स्वतःच्या पक्षाचा शिक्का मारू नये. मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्र हे आपल्या धर्मसंस्कारांचे जणू कळस होय. अशा मर्यादा पुरुषोत्तमाच्या जन्मस्थळावर उभारलेल्या त्याच्या मंदिरात चोरी, भ्रष्टाचार होणे आणि त्यावर सरकारकडून अपेक्षित कारवाई न होणे, हे लज्जास्पद व संतापजनक आहे. ज्यांच्या शासनात त्यांच्या डोळ्यांदेखत धर्मपावित्र्य मलिन होते, लुटले जाते तर ते हिंदू कसले? श्रद्धेचा व्यापार करणाऱ्या अशा मंडळींनी प्रभू श्रीरामांच्या नावाने अजिबात राजकारण करू नये. हिंदू धर्म आणि हिंदूत्वावरही बोलू नये! साधूसंतांच्या या भूमीत निदान देवधर्मावर तरी वाईट नजर पाडू नका.



























































