
>>वैश्विक<<
अनादि काळापासून माणूस चंद्र-सूर्य पाहात आला. सूर्याच्या उन्हात तर चंद्राच्या चांदण्यात न्हात आला. हे दोन मोठे दृष्टीला सारखेच दिसणारे, परंतु आकारात प्रचंड फरक असणारे गोलक, माणसांच्या काव्याचा विषय ठरले. असा हा चंद्र 20 जुलै 1969 रोजी पादाक्रांत झाला. अमेरिकेत मध्यरात्र असली तर आपल्याकडे 21 जुलैची दुपार होती. व्हॉइस ऑफ अमेरिका, बीबीसी वगैरे रेडिओ-टीव्हीवरून त्याची ‘कॉमेन्टरी’ सांगितली जात होती… आणि ऐकण्याची संधी प्राप्त झाली होती. पुढे 26 ऑक्टोबर 1969 रोजी नील ऑर्मस्ट्राँग, एडविन ऑल्ड्रिन आणि मायकेल कॉलिन्स यांना मुंबईत प्रत्यक्ष पाहता आलं. चंद्र ‘अनुभवलेली’ पहिली दोन माणसं आम्ही पाहिली, याचंच तेव्हा किती अप्रूप वाटलं होतं!
पहिल्या चांद्रमोहिमेत ‘चंद्रस्पर्शा’ची अनुभूती आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन यांनाच झाली. कॉलिन्स ते परतण्याची प्रतीक्षा करत कोलंबिया यानातून चांद्रपरिक्रमा करत होता. त्याला चंद्राजवळ जाऊनही चंद्रस्पर्शाची अनुभूती कधीच घेता आली नाही. पुढच्या अनेक चांद्रमोहिमांमध्येही कॉलिन्स चांद्रपृष्ठावर जाऊ शकला नाही. पहिल्या दोन चांद्रवीरांनंतर आणखी दहा जण 1972 पर्यंत चंद्राला भेट देऊन आले. ते सगळे अमेरिकन चांद्र प्रकल्पातूनच गेले होते. रशियाने अंतराळात पहिला माणूस पाठवला, पण चंद्रावर कधीच कोणाला पाठवलं नाही. तेव्हापासून आजतागायत चंद्रावर उतरण्याचा अनुभव केवळ अमेरिकन अंतराळयात्रींनी घेतला आहे. या बारापैकी सारे पुरुष चांद्रयात्रीच आहेत. एखाद्या महिलेला चंद्रावर पाठवावं असं त्या काळात अमेरिकेला वाटलं नाही हे आश्चर्यच. आता मात्र पुन्हा चंद्राकडे लक्ष गेलेल्या अमेरिकेने महिला अंतराळयात्रींचा समावेश करायला सुरुवात केली असल्याचं ‘अर्टेमिस’ प्रकल्पातील क्रिस्तियान कूक (स्पेलिंग कोच) या पहिल्या महिला चांद्रपरिक्रमा करणाऱ्या अंतराळयात्री. भावी काळात चंद्रावर महिला अंतराळयात्री कोण पाठवतं पाहायचे.
या लेखात ‘चंद्रस्पर्श’ झालेल्या त्या बारा जणांविषयी. अपोलो-11 मोहिमेत नील ऑर्मस्ट्राँग आणि एडविन पिंवा बझ ऑल्ड्रिन हे पहिले चांद्रवीर 1969 मध्ये अंतराळी इतिहास घडवून आले. तेव्हा ऑर्मस्ट्राँग म्हणाले, ‘एका माणसासाठी हे छोटं पाऊल असलं तरी मानवतेसाठीची ही प्रचंड झेप आहे.’ बझ ऑल्ड्रिनने चंद्र खूप सुंदर असल्याचं सांगितलं. त्यानंतर 1969 मध्येच अपोलो-12 मोहिमेतून पिट कॉनॅड (कॉन्रॅड) आणि अॅलन बीन यानी चंद्राला भेट दिली. ते अनुक्रमे तिसरे आणि चौथे चांद्रयात्री ठरले. पिट हा नौदलाचा पायलट होता. त्याचा सहकारी अॅलन चंद्रावरून परतल्यावर चित्रकार झाला आणि त्याने त्याच्या ‘पेंटिंग’मध्ये चंद्रावरची खरी धूळ वापरली असं म्हणतात!
त्यानंतर अपोलो-14 मधून अॅलन शेफर्ड चंद्रावर उतरला. त्याने तिथे दोन गोल्फ- बॉल टोलवले! त्याचा सहकारी एडगर मिचेल याने चंद्रानुभव घेतला आणि पृथ्वीवर परतल्यानंतर मानवी जाणिवा कॉन्शसनेस) या विषयावर अभ्यास करणारी संस्था स्थापन केली.
12 आणि 14 मध्ये अर्थातच अपोलो-13 मिशन होतं. सर्व तयारीनिशी 11 एप्रिल 1970 या दिवशी चंद्राकडे झेपावलं. त्यात कमांडर लॉव्हेल आणि मोल्डय़ुल पायलट जॅक स्वीजर्ट तसंच चंद्रावर उतरणाऱ्या ‘लँडर’चा पायलट फ्रेड हेझ असे तिघे होते. ही मोहीम यशस्वी ठरली असती तर चांद्रवीरांची संख्या 15 झाली असती. परंतु सर्व्हिस यानातला ऑक्सिजन टँक वाटेतच फुटला. ते लक्षात येताच ‘फ्री रिटर्न’ वर्तुळापर्यंत गेलेल्या ‘ओडेसी’ यानाला पृथ्वीकडे त्वरित परत वळवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि सर्व अंतराळयात्री ‘चंद्रस्पर्श’ न करता सुखरूप परतले. या घटनेवर नंतर चित्रपटही आला. 17 एप्रिल 1970 रोजी ते परतल्यावर जगाने सुटकेचा निःश्वास सोडला.
अपोलो-15 मोहिमेत 1971 मध्ये डेव्हिड स्कॉट आणि जेम्स आयर्विन होते. डेव्हिड हा चंद्रावर मानवनिर्मित गाडी चालवणारा पहिला माणूस ठरला. त्याने यानातून एक पिस आणि हातोडा टाकून गॅलिलिओ यांचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत चंद्रावरही प्रत्यक्षात आणण्याचा यशस्वी प्रयोग केला. अपोलो-16 मधून चंद्रावर गेलेल्यांमध्ये जॉन यंग 6 वेळा अंतराळप्रवास करणारा यात्री होता. त्याचा साथी चार्लस् डय़ुक हा अवघ्या 36 वर्षांचा सर्वात तरुण ‘मूनवॉकर’ ठरला. शेवटच्या अपोलो-17 मोहिमेतून 1972 मध्ये जेन सर्नन आणि हॅरिसन श्मिट हे चंद्रावर फिरले. हॅरिसन शास्त्र्ाज्ञही होता. पण चंद्रावर शेवटचं पाऊल ठेवणारा होता सर्नन. आणि इथेच नील आर्मस्ट्राँगपासून सुरू झालेली चंद्रस्पर्शाची अनुभूती देणारी मोहीम थांबवली. यानंतर अर्टेमिस आणि कधीकाळी पर्यटकही चंद्रावर जातील!




























































