
मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण होण्याआधीच सिंधुदुर्गातील ओसरगाव टोल नाक्यावर टोल वसुली सुरू करण्याचे नियोजन केले जात आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. स्थानिकांना टोलमधून सूट देण्याबाबत वस्तुस्थिती कळविण्यात यावी, अशा सूचना राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने सचिव राष्ट्रीय महामार्ग यांना दिल्या आहेत.
पेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने मुंबई-गोवा महामार्गाचे काम अर्धवट असतानाही ओसरगाव टोल नाका सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. महामार्ग विभागाने काढलेल्या नवीन निविदेमध्ये स्थानिक वाहनांना टोलमधून कायमस्वरूपी वगळण्याबाबत स्पष्ट उल्लेख नाही. तसेच महामार्गाच्या कामाची गुणवत्ता आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार न करता टोल लादणे चुकीचे असल्याकडे शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच संबंधित विभागांचे लक्ष वेधत महामार्गाचे काम पूर्ण झाल्याशिवाय टोल वसुली सुरू करू नये, अशी मागणी केली होती.
या पत्राची गंभीर दखल घेत उप अभियंता तथा कार्यासन अधिकारी श्रीकांत टिळेकर यांनी याबाबत योग्य ती कार्यवाही करून त्याबाबतची वस्तुस्थिती अरविंद सावंत तसेच शासनास कळविण्यात यावी, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत.



























































