
मुंबई आणि उपनगरांतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण झाल्याने खड्डे दुरुस्तीवरील खर्चात कोट्यवधींची बचत झाली आहे, असा दावा वारंवार पालिका प्रशासन वेळोवेळी करते. मात्र तरीही लहानमोठय़ा रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी पालिकेकडून करोडोंचे कंत्राट काढण्यात येते. आताही महापालिकने मुंबईतील पाच वॉर्डातील खड्डे आणि बॅड पॅचेस मास्टिक अस्फाल्ट वापरून भरण्यासाठी कंत्राट काढले आहे. या कामासाठी पालिका सुमारे 3.84 कोटी खर्च करणार आहे.
पावसाळ्यातील खड्डे दुरुस्तीसाठी महापालिकेने कंत्राट काढले असून ते मंजुरीसाठी येत्या स्थायी समितीत येणार आहे. या प्रस्तावानुसार, खड्डय़ांचे प्रमाण पावसाळ्यात कमी व्हावे म्हणून महापालिका पावसाळ्यापूर्वी, पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. ए, बी, सी, डी आणि ई विभागात 9 मीटर पेक्षा कमी रुंदीच्या आणि 9 मीटरपेक्षा जास्त रुंदीचे असे लहानमोठे खड्डे आणि खराब भाग भरण्यात येणार आहे. मास्टिक अस्फाल्ट वापरून खड्डे बुजवले जाणार आहेत. या कामांसाठी मेसर्स मानष कन्स्ट्रक्शन कंपनीला कंत्राट दिले जाणार आहे.
पाच वॉर्डांसाठी पालिका 3.84 कोटी खर्च करणार, दोन्ही कंत्राटे एकाच कंपनीला
पावसाळ्या दरम्यान आणि पावसाळ्यानंतरही खड्डय़ांची आणि खराब भागांची दुरुस्ती करण्याचे काम मेसर्स मानष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले आहे. ए, बी, सी, डी आणि ई या विभागात नऊ मीटर पेक्षा कमी रुंदीचे खड्डे पॅचेस भरण्यासाठी 1 कोटी 83 लाख रुपये तर त्यावरील मोठे खड्डे भरण्यासाठी सुमारे 2 कोटी 1 लाख रुपये खर्च केले जाणार आहेत. कंत्राटदाराला 31 मार्च 2027 पर्यंत ही कामे पूर्ण करावी लागतील.
- ए, बी, सी, डी आणि ई विभागात 9 मीटर पेक्षा कमी रुंदीच्या आणि 9 मीटरपेक्षा जास्त रुंदीचे असे लहानमोठे खड्डे आणि खराब भाग भरण्यात येणार आहे.




























































