
गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेले असताना आता या काळात चांदीपुरा व्हायरसने डोके वर काढले आहे. गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसचा धुमाकूळ सुरू असून आतापर्यंत 22 चिमुकल्यांना जीव गमवावा लागला आहे. गुजरातमध्ये नोंदवलेल्या 184 संशयित रुग्णांपैकी 35 जणांना या धोकादायक व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती आरोग्य मंत्री प्रफुल पानसेरिया यांनी दिली.
सध्या 11 संशयित नमुन्यांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्यांपैकी 7 बालकांवर सध्या राज्यातील विविध सिव्हिल हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेत, तर 6 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. गांधीनगर, साबरकांठा-हिंमतनगर, पाटण, राजकोट आणि भावनगर येथील रुग्णालयांमध्ये बालरोगतज्ज्ञांच्या देखरेखीखाली चिमुकल्यांवर विशेष उपचार केले जात आहेत, अशी माहिती ‘इंडिया टूडे‘ने दिली.
15 वर्षांखालील बालकांना सर्वाधिक धोका
बाधित आढळलेली सर्व मुले 15 वर्षांखालील आहेत. हा संसर्ग कोणत्याही एका विशिष्ट भागात किंवा जिल्ह्यात मर्यादित नसून, गुजरातच्या विविध भागांतून रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.
कीटकनाशकांची फवारणी सुरू
दरम्यान, चांदीपुरा व्हायरसचा प्रसार प्रामुख्याने माशांपासून होतो. या माशा गुरांच्या गोठ्यात व जनावरांच्या परिसरात जास्त प्रमाणात आढळतात. त्यामुळे गुरांचे गोठे असणाऱ्या भागांमध्ये कीटकनाशकांची फवारणी सुरू करण्यात आली आहे. तसेच, नागरिकांनी मातीच्या घरांच्या भिंतींमधील भेगा बुजवाव्यात, कारण या भेगांमध्ये कीटक अंडी घालतात, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
लक्षणे दिसताच रुग्णालयात दाखल व्हा
चांदीपुरा व्हायरसवर कोणताही विशिष्ट लस किंवा औषध उपलब्ध नाही. त्यामुळे वेळीच दिलेले उपचार हेच बचावाचे साधन आहे. तीव्र ताप, उलट्या होणे, शुद्ध हरपणे यासारखी लक्षणे दिसताच तात्काळ बालकांना आयसीयूमध्ये दाखल करण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व सरकारी आणि खासगी बालरुग्णालयांना दिले आहेत.
काय आहे चांदीपुरा व्हायरस?
चांदीपुरा एन्सेफलायटीस हा एक दुर्मिळ पण अत्यंत गंभीर विषाणूजन्य आजार आहे. यामुळे मेंदूला सूज येते. या विषाणूचा शोध सर्वात आधी 1965 मध्ये महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील चांदीपुरा या गावात लागला होता. हा आजार प्रामुख्याने लहान मुलांना लक्ष्य करतो आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास अत्यंत वेगाने पसरून प्राणघातक ठरतो.





























































