“रामाच्या नावाने चोरी करणाऱ्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी”, मोदींचे नाव घेत मल्लिकार्जुन खरगे राज्यसभेत आक्रमक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राम मंदिर देणगी घोटाळा आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष लाठीचार्जवर संसदेच्या दोन्ही सदनामध्ये चर्चेची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्यातही याचे पडसाद उमटत असून राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी हा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. प्रभू श्रीरामाच्या नावाने चोरी करणाऱ्यांनी संपूर्ण देशाची माफी मागावी आणि देशाची दिशाभूल करणे थांबवावे, अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेत केली. यावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत राज्यसभा दणाणून सोडली. यामुळे राज्यसभेचे कामकाज 2 वाजेपर्यंत तहकूबही करण्यात आले.

श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टमध्ये मौल्यवान भेटवस्तू, रोख दान, जमीन खरेदी आणि व्यवस्थापनाबाबत गंभीर आरोप समोर आले आहेत. हा कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. या ट्रस्टची स्थापना केंद्र सरकारने केली असून, त्याची घोषणा खुद्द पंतप्रधान मोदी यांनी संसदेत केली होती. केंद्र सरकारने 70 एकराहून अधिक जमीन या ट्रस्टकडे सोपवली आहे आणि पंतप्रधान मोदी भूमिपूजनापासून ते प्राणप्रतिष्ठेपर्यंतच्या प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगात सहभागी राहिले आहेत, असे खरगे राज्यसभेत म्हणाले.

अशा परिस्थितीत, दानातील चोरीसह इतर गंभीर आरोपांबाबत पंतप्रधान स्वतःच्या उत्तरदायित्वापासून पळ काढू शकत नाहीत. ईडी, सीबीआय, आयकर विभागासह इतर तपास यंत्रणा नेमक्या कुठे आहेत, याचे स्पष्टीकरण त्यांनी संसदेत दिले पाहिजे. प्रभू रामाच्या नावावर लूट करणाऱ्यांनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे आणि देशवासीयांची दिशाभूल करण्याचे काम त्वरित बंद झाले पाहिजे, अशी मागणीही खरगे यांनी केली.

दरम्यान, संसदेबाहेरही विरोधकांनी सरकारला घेरले आहे. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि राम मंदिर देणगी चोरीवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. अमित शाह सदन में आओ, सदन में आकर जवाब दो, अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी सरकारवर हल्ला चढवला.