
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगीच्या कथित अपहाराच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांच्या जोरदार घोषणाबाजीमुळे राज्यसभेचे कामकाज मंगळवारी दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
राज्यसभेचे कामकाज सकाळी ११ वाजता सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी १२ वाजता सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू होताच सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी प्रश्नोत्तराचा तास सुरू केला.
मात्र, विरोधी पक्षांनी राम मंदिरातील देणगीच्या कथित अपहाराचा मुद्दा उपस्थित करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. काही विरोधी सदस्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात उपस्थित राहावे, अशीही मागणी केली.
डीएमकेचे सदस्य तिरुची शिवा यांनी तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांचे पुत्र उदयनिधी स्टालिन यांच्या अटकेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा राज्य सरकारच्या अखत्यारीतील विषय असून तो सभागृहात उपस्थित करता येणार नाही, असे सभापतींनी स्पष्ट केले.
सततची घोषणाबाजी आणि गोंधळ सुरूच राहिल्याने राधाकृष्णन यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब केले.
यापूर्वीही राम मंदिरातील रोख रक्कम आणि इतर मौल्यवान वस्तूंच्या कथित अपहाराच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांमध्ये झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.
विरोधी पक्षांनी श्रीराम मंदिराला भाविकांनी अर्पण केलेली रोख रक्कम आणि मौल्यवान वस्तूंच्या कथित अपहाराचा मुद्दा उपस्थित करत सरकारला घेरले आहे. तसेच दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांवर झालेला लाठीचार्ज आणि अन्य घटनांवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे विरोधाकांच्या निशाण्यावर आलेले आहेत.
दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानंतर गोंधळ थांबेना अखेर सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तहकूब केले.



























































