
‘गजनी’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 74 वर्षांचे होते. बॉलीवूडसह साऊथच्या अनेक चित्रपटांत त्यांनी खलनायकाची भूमिका साकारली होती. त्यांच्या निधनामुळे मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
‘लगान’ या चित्रपटातील त्यांचे सहअभिनेते यशपाल शर्मा यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत प्रदीप रावत यांच्या निधनाची माहिती दिली आहे. प्रदीप रावत यांचे मॅनेजर सिद्धार्थ तिवारी यांनीही निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, अभिनेते प्रदीप रावत कर्करोगाशी झुंज देत होते आणि त्यांना या आजाराचा पुन्हा एकदा त्रास सुरू झाला होता. गेल्या महिन्यापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
शंभरहून अधिक चित्रपटांत भूमिका
प्रदीप रावत हे मूळचे जबलपूरचे. करीअरच्या सुरुवातीला त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण त्यांची उंची पाहून बीआर चोप्रा यांनी ‘महाभारत’ मालिकेत त्यांना अश्वत्थामाची भूमिका दिली. यानंतर त्यांना छोट्या बजेटच्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका मिळू लागल्या. त्यात त्यांना यश न मिळाल्यामुळे त्यांनी सहाय्यक भूमिका करण्याचा निर्णय घेतला. चार दशकांच्या करीअरमध्ये त्यांनी बॉलीवूडसह तेलुगू आणि तमीळ, कन्नड, मल्याळम भाषेतील शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले.
‘सरफरोश’,‘लगान’मुळे मिळाली लोकप्रियता
प्रदीप रावत यांनी ‘ऐतबार’, ‘अग्निपथ’, ‘बागी’, ‘कोयला’, ‘मेजर साब’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले, पण त्यातून फारशी काही ओळख मिळाली नाही. ‘सरफरोश’मधील सुलतान तसेच ‘लगान’ चित्रपटातील देवा सिंग सोढीच्या भूमिकेमुळे त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. ‘सई’ या तेलुगू तसेच ‘गजनी’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या खतरनाक खलनायकाची भूमिका आजही प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. ‘छावा’ या चित्रपटात येसाजी कंक यांच्या भूमिकेत ते झळकले होते.



























































