गृह आणि वाहन कर्ज घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी; RBI ने रेपो रेट केला जाहीर, तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गृहकर्ज आणि वाहन कर्ज घेणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने पतधोरण बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेपो रेटमध्ये यावेळी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या रेपो रेट 5.25 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे कर्ज घेणाऱ्यांचा हप्ता ना कमी होणार आहे, ना वाढणार आहे.

बँकेने आपला तटस्थ दृष्टिकोन कायम ठेवत रेपो रेट 5.25 टक्क्यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी दिली. जागतिक पातळीवर अद्याप अनिश्चिततेचे वातावरण आहे आणि कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये सतत चढ-उतार पाहायला मिळत आहेत, असेही यावेळी ते म्हणाले. तसेच स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी रेट 5.00 टक्क्यांवर स्थिर आणि मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी रेट 5.50 टक्क्यांवर स्थिर ठेवण्यात आला आहे.

जागतिक पातळीवरील आर्थिक संकटांविषयी बोलताना मल्होत्रा यांनी जागतिक आर्थिक वाढीबद्दल सकारात्मकता व्यक्त केली. विविध जागतिक तणावांनंतरही हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेची कामगिरी अपेक्षेपेक्षा उत्तम राहिली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आगामी वित्तीय वर्ष 2027 साठी जीडीपा वाढीचा अंदाज 6.6 टक्क्यांवरून वाढवून 6.7 टक्के करण्यात आला आहे. पहिल्या तिमाहीत जीडीपी 7 टक्के राहण्याचा आहे. तर दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा अंदाज 6.3 टक्क्यांवरून 6.4 टक्के करण्यात आला आहे.

महागाईबाबत आरबीआयचा अंदाज

खाद्यान्न आणि इंधनाच्या किमतींमधील वाढीमुळे देशातील किरकोळ महागाई अपेक्षेपेक्षा जास्त राहिली असून मान्सूनमुळे यात जोखीम वाढली असल्याचे मल्होत्रा यांनी नमूद केले. असे असले तरी, आरबीआयने FY27 साठी किरकोळ महागाईचा अंदाज 5.1 टक्क्यांवरून कमी करून 5 टक्के केला आहे. पहिल्या तिमाहीत महागाई 5.3 टक्के, दुसऱ्या तिमाहीत 4.7 टक्के, तिसऱ्या तिमाहीत 5.9 टक्के आणि चौथ्या तिमाहीत 5.5 टक्के राहील असा अंदाज आहे.