भ्रष्टाचार आणि दलालीच्या खांबांवर उभं केलेलं आपलं सरकारही… रोहित पवार यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गडचिरोलीत तीन वर्षापूर्वी तत्कालिन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला पूल हा मुसळधार पावसात वाहून गेला आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. ”भ्रष्टाचार आणि दलालीच्या खांबांवर उभं केलेलं आपलं सरकारही एक दिवस असंच खचल्याशिवाय राहणार नाही”, असे रोहित पवार यांनी ट्विट केले आहे.

Photo – तीन वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीसांनी उद्घाटन केलेला गडचिरोलीत पूल वाहून गेला

”आपण पालकमंत्री असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील आपणच उद्घाटन केलेला पूल ३ वर्षे व्हायच्या आतच खचला.. छे… छे… खचला नाही.. कदाचित तीन वर्षांची durability चेक करत असतील किंवा हे एखादं नवीन डिझाईन असावं, जे पाऊस उघडताच पुन्हा मूळ रूपात दिसेल. पूल खचला म्हणलं तर कदाचित आमच्यावर देशद्रोहाचा शिक्का पडायचा. असो! दलालीच्या दलदलीत मजबूत कामाची अपेक्षा तरी कशी ठेवणार? आज केवळ पूल खचला, पण गेल्या तीन-चार वर्षांत इन्फ्रास्ट्रक्चरच्या नावाखाली cost escalation करून भ्रष्टाचार आणि दलालीच्या खांबांवर उभं केलेलं आपलं सरकारही एक दिवस असंच खचल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की”, असे रोहित पवार म्हणाले.