
शिक्षणमहर्षी तथा डी. वाय. पाटील शिक्षण समुहाचे सर्वेसर्वा आणि बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, विधानसभेचे माजी सदस्य, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील (दादा) यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात व शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी ‘अमर रहे…जब तक सूरज चाँद रहेगा…दादा तेरा नाम रहेगा..’च्या अखंड जयघोषात हजारो आबालवृद्धांकडून आपल्या लाडक्या दादाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
कसबा बावडा येथील निवासस्थानी मंगळवारी सकाळी वयाच्या 91 व्या वर्षी डॉ. डी. वाय. पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने शिक्षण, आरोग्य तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्र हळहळले. काल सकाळपासून ते आज सायंकाळपर्यंत अंत्यदर्शनासाठी सर्वच क्षेत्रांतील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांची अखंड रिघ लागली होती.
आज सायंकाळी चारच्या सुमारास डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, लाईन बाजार येथून सजवलेल्या वाहनातून अंत्ययात्रा काढण्यात आली. मुख्य मार्गावरील रस्त्यांच्या दुतर्फा थांबलेल्या आबालवृद्धांसह गल्लोगल्लीतून फुलांचा वर्षाव आणि ‘डी. वाय. पाटील अमर रहे’चा जयघोष सुरू होता. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पॅव्हेलियन मैदानात धार्मिक अंत्यविधीनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी शांतादेवी डी. पाटील व डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, डॉ. विजय डी.पाटील, डॉ. अजिंक्य डी. पाटील, डॉ. उद्धव पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, वैजयंती संजय पाटील, प्रतिमा सतेज पाटील, पूजा ऋतुराज पाटील, वृषाली पृथ्वीराज पाटील, देवश्री सतेज पाटील, राजेश खडके, देवराज पाटील, निशांत पाटील, सुशांत पाटील, अर्जुन पाटील, आर्यमन पाटील, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. भाग्यश्री पी. पाटील, प्रतापराव चव्हाण-पाटील, सुप्रिया प्रतापराव चव्हाण-पाटील, मेघराज काकडे, राजश्रीताई काकडे, डॉ. विजय डी. पाटील, शिवानी विजय पाटील, डॉ. अजिंक्य डी. पाटील, पूजा अजिंक्य पाटील, डॉ. प्रदीप पालशेतकर, डॉ. नंदिता पालशेतकर, डॉ. प्रिया चोलेरा, रश्मिन चोलेरा, अनिल मोरे, अजय आवटे, सुहासराव पाटील, स्मितादेवी योगेश जाधव, सोमनाथ पाटील, भरत चव्हाण-पाटील, करण काकडे यांच्यासह कुटुंबीय उपस्थित होते.
पुष्पचक्र अर्पण
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, हसन मुश्रीफ, खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती, डॉ. प्रतापसिंह जाधव, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन संकपाळ, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, आमदार यशोमती ठाकूर, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार विश्वजित कदम, आमदार विनय कोरे, चंद्रदीप नरके, जयंत आसगांवकर, हेमंत ओगले, माजी आमदार हर्षवर्धन पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, संजय मंडलिक, निवेदिता माने, संभाजीराजे छत्रपती, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती, के. पी. पाटील, संजय पाटील, राजू आवळे, राजीव आवळे, सत्यजित पाटील-सरुडकर, विशेष पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा, जिल्हाधिकारी विजय राठोड, मनपा आयुक्त राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जि.प. सीईओ जॅस्मिन, उपमहापौर अक्षय जरग, इचलकरंजी महापौर उदय धातुंडे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सांगली मनपाच्या वतीने विरोधी पक्षनेते मंगेश चव्हाण, उद्योगपती संजय घोडावत, मुंबई मनपाच्या वतीने नवी कौशिक यांनी पुष्पचक्र अर्पण केले.
दरम्यान, आज सकाळपासून दिवसभरात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, उपमुख्यमंत्री शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, वनमंत्री गणेश नाईक, माजी न्या. बी. जी. कोळसे-पाटील, कर्नाटकचे माजीमंत्री आर. एम. पाटील, माजीमंत्री वीरकुमार पाटील, अन्न पुरवठामंत्री छगन भुजबळ, पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे, अभिनेते सयाजी शिंदे, आमदार विजय वडेट्टीवार, सचिन सावंत यांच्यासह आजी-माजी मंत्री, खासदार, आमदारांसह विविध क्षेत्रांतील पदाधिकाऱयांनी अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील यांच्यासोबतच्या आठवणीही त्यांनी जागवल्या. तर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी, आनंद महाराज सांगवडेकर आदींनी फोनवरून सांत्वन केले.






























































