
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 234 कोटी रुपयांची थकबाकीदार असलेल्या सहा संस्थांच्या विक्रीसाठी तब्बल पाचव्यांदा लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. यात पाच सूतगिरण्यांचा समावेश आहे. या सर्व संस्था जिह्यातील विविध बड्या नेत्यांशी संबधित आहेत. गेली पाच वर्ष या संस्था विक्री करून त्यांच्याकडून थकबाकी वसुलीचा प्रयत्न जिल्हा बँक करीत आहे. मात्र, त्यात अद्याप यश आले नाही. यावेळी तरी या संस्थांची विक्री होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी (ता. तासगाव), खानापूर तालुका को-ऑप. स्पिनिंग मिल गार्डी (ता. खानापूर), शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी वाळवा, प्रतिबिंब मागासवर्गीय को-ऑप. इंडस्ट्रिज वाळवा, विजयालक्ष्मी कॉटन मिल्स आटपाडी या पाच सूतगिरण्यांसह डिवाईन फूडस प्रा. लि. या संस्थेचा लिलाव काढला आहे. यासाठी 21 ऑगस्टपर्यंत निविदा मागवल्या असून, 27 ऑगस्टला त्या उघडल्या जाणार आहेत. या सर्व संस्थांकडे मिळून सुमारे 234 कोटींपेक्षा अधिक थकबाकी आहे.
सांगली जिल्हा बँकेने थकबाकी वसुलीसाठी मागील संचालक मंडळाच्या काळात सिक्युरायझेशन ऍक्टअंतर्गत काही सहकारी संस्था व खासगी कंपन्यांवर कारवाई करत या संस्था ताब्यात घेतल्या. या संस्थांकडील थकबाकी वसुलीसाठी जिल्हा बॅँकेने सातत्याने प्रयत्न केले. मागील संचालक मंडळाच्या काळात या संस्था भाडेतत्वावर चालवण्यास देण्याचे तसेच विक्रीचे प्रयत्न झाले. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाहीत. या संस्थांकडील थकबाकीमुळे जिल्हा बँकेचा एनपीए मोठ्या प्रमाणात वाढला होते.
आरबीआयकडून याप्रकरणी कारवाईचा इशारा देण्यात आला. यानंतर जिल्हा बँकेने मागील संचालक मंडळाच्या काळात यातील चार सूतगिरण्या व महांकाली आणि माणगंगा हे दोन साखर कारखाने स्वतः खरेदी करत बॅँकेच्या असेट वाढवत एनपीए कमी केला. त्यानंतरही बँकेने सदरच्या संस्था विक्रीसाठी तसेच भाड्याने देण्यासाठी निविदा मागवल्या; पण त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. यातील महांकाली व माणगंगा कारखान्याला बँकेने ओटीएसचा लाभ दिला आहे. त्यामुळे खरेदी केलेल्या चार सूतगिरण्या, डिवाईन फूडस कंपनी व स्वामी रामानंद भारती सूतगिरणी या सहा संस्थांची पुन्हा एका जिल्हा बँकेने लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे.
लिलाव होणाऱ्या संस्था
स्वामी रामानंद भारती सहकारी सूतगिरणी, ता. तासगाव.
खानापूर तालुका को-ऑप स्पिनिंग मिल, गार्डी. ता. खानापूर.
शेतकरी विणकरी सहकारी सूतगिरणी, वाळवा.
प्रतिबिंब मागासवर्गीय को ऑप. इंडस्ट्रिज, वाळवा.
विजयालक्ष्मी कॉटन मिल्स, आटपाडी. डिवाईन फूडस प्रा. लि. पलूस.






























































