मुंबईतल्या मोकळ्या जागा भाजप ढापण्याच्या तयारीत, शिवसेना रस्त्यावर उतरून विरोध करणार – आदित्य ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिटिशांप्रमाणे भाजपही ‘मुंबईकर Not Allowed’ चे बोर्ड मोकळ्या मैदानावर लावतील, अशी टीका शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच मुंबईतल्या मोकळ्या जागा भाजप ढापण्याच्या तयारीत आहे. शिवसेना रस्त्यावर उतरून याचा विरोध करणार असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे म्हणाले की, नवीन महापौर बंगल्यासाठी साडे पाच कोटी रुपयांचा खर्च होणार होता. हे पैसे मुंबईकरांच्या खिशातून गेलेले होते आणि आपण ते खर्च होण्यापासून रोखले आहेत. महापौर होऊन सहा महिनेही झाले नाहीत, पण गाडीवर लाल दिवा आणि सायरन लावलं होतं. मग इंटिरियर डेकोरेशनमध्ये इटालियन मार्बल लावलेलं आहे. जणू काही त्यांना ताजमहालच बाधायचा होता. आपण मुंबईकर म्हणून आवाज उठवला, विरोध केला. माध्यमांनीही हा आवाज सगळीकडे पोहोचवला. मुंबई महानगर पालिकेने या निर्णयाला आता स्थगिती दिलेली आहे. या स्थगिती दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. महापौर आणि उपमहापौरांच्या सोयीसुविधांवर भाजपने विशेष लक्ष दिलेले आहे. या गोष्टींकडे आमचे लक्ष राहिलच आणि विरोध असेलच, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबईमध्ये ज्या मोकळ्या जागा आहेत त्या भाजप ढापण्याच्या तयारीत आहे. नेव्हिल फुटबॉल टर्फवर हजारो मुलं इथे खेळतात. हे मैदान ढापून भाजपने आपल्या आवडत्या कंत्राटदाराला देऊन कन्वेशन सेंटर बनवायचं होतं आणि भाजपच्या नेत्याचं नाव द्यायचं होतं. या गोष्टींना आम्ही रस्त्यावर उतरून विरोध करणार. पण भाजप इथेच थांबलेलं नाहिये. भाजपने मुंबईतील 16 एकर जागा एका ट्रस्टला दिलेली आहे. त्यात अंधेरीतल्या मैदानाचा समावेश आहे. आम्ही सत्तेत असताना हे मैदान आम्ही खुलं केलं होतं. याच भागात मियावाकी उद्यान होतं, ते ही भाजपने ढापलेलं आहे. हे मैदान 21 लाख वर्षाला भाडे तत्त्वावर दिले आहे. तसेच म्हाडाचे दोन प्लॉट एका ट्रस्टला फुकट दिले आहे. मुख्यमंत्र्यांना कुठल्या तरी भाषेला किंवा संस्थेला प्राधान्य द्यायचे असे आरोप मी करणार नाही. पण मुंबईतल्या मोकळ्या जागा ढापायच्या आणि भाजप नेत्यांना द्यायचे धोरण मुख्यमंत्र्यांनी राबवलेले आहे, त्याला आम्ही कडाडून विरोध करणार.

याच मोकळ्या मैदानांवर सामान्य मुंबईकरांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. ब्रिटिशांनी Indians Not Allowed असे बोर्ड काही ठिकाणी लावले होते. आता भाजपही Mumbaikar Not Allowed अशा पाट्या लावणार आहे का? एका बाजूला अदानी मुंबई गिळत चाललेला आहे. धारावीसाठी आम्ही लढा देत आहोतच. दुसरीकडे एका संस्थेला 16 एकर जागा देणं हा किती मोठा गुन्हा आहे. या निर्णयाविरोधात आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहोत. मी सर्व मुंबईकर आणि मुंबईप्रेमींना आवाहन करत आहे की मुंबईची मोकळ्या जागा मुंबईच्याच हातात राहिली पाहिजे या मागणीसाठी या मोर्च्यात सामील झाले पाहिजे. हा मोर्चा कधी होणार, कसा होणार याबाबत लवकरच तुम्हाला सांगू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

स्वतःच्या लोकांवर उधळपट्टी करायची, बेस्टच्या बसेस बंद करायच्या, अदानीला जमिनी द्यायच्या, जागा ढापायच्या हे भाजपकडून सुरू आहे. उद्या आझाद मैदान, ओव्हल मैदान आणि शिवतीर्थही घ्यायला भाजप मागे पुढे पाहणार नाही. याच्याविरोधात रस्त्यावर उतरून आम्ही कडाडून विरोध करणार आहोत.

मुंबईच्या जागेवर मुख्यमंत्र्यांनी बोली लावली? मुंबईचा लिलाव सुरू केला आहे का? हा काय घोडाबाजार वाटला? 50 खोके घेऊन आमदार विकत घेण्याची भाजपला सवय असेल पण मुंबईच्या रिकाम्या जागा तुम्ही लिलावात काढणार? असा सवालही आदित्य ठाकरे यांनी विचारला.

मी अद्याप त्या संस्थेचं नाव घेतलेलं नाही किंवा त्या आमदाराचं नाव घेतलेले नाही. कारण आमचं भांडण त्यांच्याशी नव्हे तर त्या प्रक्रियेशी आहे. या राजवटीशी आणि शासनाशी आहे.

काही शाळांनी मोकळी मैदानं पालिकेकडून घेतली, तिथे टर्फ टाकून सर्वसामान्यांना प्रवेश बंदी केली आहे. पालिकेत आमचे सरकार असताना सकाळी 5-9 आणि सायंकाळी 5-9 ही मैदानं आणि उद्यानं सर्वसामान्यांसाठी खुली राहतील असा नियम होता, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी नमूद केले.