‘आज नाही तर उद्या, या गुन्ह्याचे उत्तर द्यावेच लागेल’; राहुल गांधींचा अमित शाह, मोदींवर निशाणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी प्रयागराजमधील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून केंद्र सरकारवर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे.

“आता माझ्याकडे कोणताही मार्ग उरलेला नाही”, असे प्रयागराजमध्ये एका विद्यार्थ्याने आपल्याला सांगितल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. अनेक वर्ष तयारी केली, घरची जमीन विकली, आई-वडिलांवर कर्ज झाले आणि एवढे करूनही हातात काहीच आले नाही, अशी त्या विद्यार्थ्याची व्यथा होती. हा पराभव त्या विद्यार्थ्याचा नसून, त्याच्या मेहनतीची किंमत देण्यास नकार देणाऱ्या व्यवस्थेचा पराभव असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले.

विद्यार्थ्यांच्या या परिस्थितीवरून त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. “13 दिवस झाले, मात्र गृहमंत्री अमित शाह यांच्या तोंडून एक शब्दही निघालेला नाही. मोदीजी माफी मागण्याऐवजी क्षमा वाटत आहेत,” अशी टीका राहुल गांधी यांनी केली. तसेच अमित शाह यांनी आपण जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करणे थांबवू, असे समजू नये, असा इशाराही त्यांनी दिला.

राजधानी दिल्लीच्या रस्त्यांवर विद्यार्थ्यांवर लाठ्या आणि पेलेट चालवण्यात आले, मात्र या घटनेवर अमित शाह यांनी एक शब्दही उच्चारला नाही, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. “आज नाही तर उद्या, या गुन्ह्याचे उत्तर तुम्हाला द्यावेच लागेल,” असे त्यांनी अमित शाह यांना उद्देशून म्हटले.

विद्यार्थी हे देशाचा प्रकाश असून त्यांच्या लढ्यात आपण पूर्ण ताकदीने त्यांच्या सोबत असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारने तातडीने लक्ष द्यावे आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईची जबाबदारी निश्चित करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.