
कोलकात्या नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळाजवळ शनिवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. क्वालालंपूरहून कोलकात्यात येणाऱ्या विमानाच्या कॉकपिट्या दिशेने अचानक एक लेझर बीम आले. यामुळे वैमानिकाच्या दृष्टीवर परिणाम झाला आणि एकच गोंधळ उडाला. यामुळे विमान नियोजित वेळेत कोलकाता विमानतळावर उतरू शकले नाही. विमानाला पुन्हा हवेत घिरट्या घालाव्या लागल्या. यानंतर अखेर नेताजी सुभाषचंद्र बोस विमानतळावर विमानाने सुरक्षित लँडिंग केले.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मलेशियन एअरलाईन्सचे MH-184 हे विमान क्वालालंपूरहून कोलकाताला येत होते. विमानात 159 प्रवासी होते. हे विमान शनिवारी रात्री 11.20 वाजता उतरणार होते. विमान लँडिंगच्या तयारीत असतानाच धावपट्टीपासून आठ नॉटिकल मैल अंतरावर मध्यमग्राम-बारासात बाजूकडून कॉकपिटच्या दिशेने प्रखर लेझर बीम वैमानिकाच्या निदर्शनास आला.
या लेझरमुळे वैमानिकाच्या दृष्टीवर परिणाम झाला आणि काही क्षणांसाठी त्याचा गोंधळ उडाला. परिणामी, विमान नियोजित वेळेत उतरू शकले नाही. अखेरीस रात्री 11.25 च्या सुमारास विमान कोलकाता विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. सर्व प्रवासी आणि कर्मचारी सुरक्षित असल्याचे विमानतळ सूत्रांनी सांगितले.
या घटनेनंतर एअरलाईनने विमानतळ प्रशासनाला माहिती दिली. कोलकाता विमानतळ प्रशासनाने नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (NSCBI) पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस पुढील तपास करत आहेत, असे कोलकाता विमानतळाचे संचालक विक्रम सिंग यांनी सांगितले.

























































