
उज्जैनमधील महाकालेश्वरचे दर्शन घेऊन घरी परतत असतानाच काळाने घाला घातला. मध्य प्रदेशातील बडनावर-उज्जैन चार-पदरी मार्गावर रविवारी दुपारी विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरने कारला जोरदार धडक दिली. या धडकेत सहा जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, गुजरातमधील सात जण उज्जैनला महाकालेश्वरच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन परतत असताना त्यांच्या कारला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रेलरने धडक दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने कारमधील सर्वांना बाहेर काढले. जखमीला बडनावर येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातानंतर काही काळ या चार-पदरी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र नंतर ती पूर्ववत करण्यात आली. अपघाताबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.


























































