
चीनमध्ये डॉल्फिन चक्रीवादळाचा धोका अधिक गडद झाला आहे. चक्रीवादळ आणि मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे शांघायमधील दोन प्रमुख विमानतळांवरील १३०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने झेजियांग प्रांतातील सुमारे ३.९ लाख नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. तसेच शांघायमधील धोक्याच्या पातळीवरील ३० हजारांपेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले आहे. टीव्ही९ भारतवर्षने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत बाधित भागात २०० ते ४०० मिलिमीटरपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळपर्यंत या चक्रीवादळातील वाऱ्याचा वेग ताशी १६२ किलोमीटर इतका नोंदवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा गंभीर धोका निर्माण झाला असून बचाव आणि मदत पथकांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शांघायच्या होंगकियाओ आणि पुडोंग विमानतळावरील सुमारे ६० टक्के विमाने रद्द केल्यामुळे हवाई वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यासोबतच सागरी वाहतुकीवरही बंदी घालण्यात आली असून, झेजियांगमध्ये क्रूझ आणि फेरी बोट यांसारख्या जल-आधारित सर्व हालचाली तात्पुरत्या स्वरूपात थांबवण्यात आल्या आहेत. तत्पूर्वी या चक्रीवादळाचा बाह्य भाग शनिवारी तैवानच्या उत्तरेकडील किनारपट्टीला धडकला, ज्यामुळे तैपेईसह अनेक भागात मुसळधार पाऊस झाला आणि चीनकडे जाणारी काही उड्डाणेही रद्द करावी लागली.


























































