
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजप सरकारने राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे उद्ध्वस्त केली असून, गुन्हेगारांमध्ये आता कायद्याचा कोणताही धाक उरलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. सध्याच्या सरकारमध्ये महिला आणि मुलींवरील अत्याचारांच्या घटना थांबण्याचे नाव घेत नसून, भाजपच्या राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
महिलांवरील गुन्हे आणि सायबर गुन्हेगारीच्या बाबतीत उत्तर प्रदेश सध्या संपूर्ण देशात सर्वात आघाडीवर असल्याची धक्कादायक बाबही त्यांनी यावेळी अधोरेखित केली. या महिलाविरोधी सरकारमध्ये उत्तर प्रदेशातील माता-भगिनींना कधीही न्याय मिळू शकत नाही, असे ते म्हणाले. कायदा आणि सुव्यवस्थेवर झिरो टॉलरन्सचा सरकारचा दावा पूर्णपणे खोटा ठरला असल्याचे ते म्हणाले.
राजधानी लखनौमधील नुकत्याच घडलेल्या भयंकर घटनांचा दाखला देत अखिलेश यादव यांनी पोलिसांच्या आणि सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. गेल्या काही दिवसांपूर्वी लखनौच्या पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नरपत खेडा येथे बीसीएच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थिनीची गळा चिरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. तसेच याच आठवड्यात बक्षी का तालाब परिसरात एका तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याची घटना उघडकीस आली. यांसारख्या सातत्याने घडणाऱ्या गुन्ह्यांमुळे राज्यातील जनतेत विशेषतः महिला वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे, असा घणाघात अखिलेश यादव यांनी केला आहे.


























































