
मराठवाड्याृत कुणबी समाजाची चार प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे समोर आल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झाले आहेत. मी समाजासाठी उपोषण करून जीव देऊ शकतो तसा वेळ पडली तर कोणाचा जीव घेऊही शकतो. मला त्या वाटेवर नेऊ नका, असा थेट इशारा त्यांनी महायुती सरकारला दिला.
माढा येथे आयोजित सभेत बोलताना मनोज जरांगे यांनी हा इशारा दिला. एक वर्षभर मी फडणवीसांना काही बोललो नाही. ज्या बावनकुळेंमुळे ते अडचणीत येतात तर त्यांनी असला मंत्री कशाला सांभाळायचा? आता मी कोणाला सोडणार नाही, अशा शब्दांत जरांगे यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
जरांगे हे सध्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱयावर आहेत. माढा येथील सभेपूर्वीही सोलापूरमध्ये आयोजित सभेत जरांगे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर घसरले होते. फडणवीस आणि शिंदे यांनी कितीही वळवळ करू द्या, त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे ते म्हणाले होते.
फडणवीसांच्या सांगण्यावरूनच नोंदी रद्द करताहेत
देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरूनच बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यास सुरुवात केली आहे, तर ज्या एकनाथ शिंदे यांनी मराठय़ांना 58 लाख नोंदी दिल्या, त्यांच्याच सांगण्यावरून मंत्री संजय शिरसाट यांनी कुणबी नोंदी रद्द करण्याचा घाट घातला आहे, असा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे.



























































