
मुंबई आणि उपनगरांतील सर्व कोळीवाडे-गावठाणांचे सीमांकन अनेक वर्षांपासून रखडले आहे. कोळीवाडे-गावठाणांच्या विकासासाठी कोणतेही धोरण नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे भूमिपुत्र कोळी समाज निवास, उपजीविका तसेच सोयीसुविधांपासून वंचित राहिला आहे.
याबद्दल कोळी बांधवांमध्ये तीव्र नाराजी आहे. कोळीवाडे-गावठाणांचे योग्य सीमांकन करून त्यांच्यासाठी तत्काळ स्वतंत्र विकास नियमावली करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.
कोळीवाडे व गावठाणांच्या विकासासंदर्भात खारदांडा कोळीवाड्याचे, शिवसेना नगरसेवक चिंतामणी निवाटे यांच्या पुढाकाराने महापौर रितू तावडे यांच्या दालनात एक महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी झाली. यावेळी शिवसेना नगरसेवक जोसेफ कोळी, नगरसेवक मिलिंद वैद्य, नगरसेविका गीता भंडारी, नगरसेविका हेमांगी वरळीकर या लोकप्रतिनिधींसह, कोळीवाडा गावठाण सेवा समिती अध्यक्ष उज्ज्वला पाटील आणि सहकारी तसेच मुंबईतील विविध कोळीवाड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तोडक कारवाई थांबवा कोळीवाडे व गावठाणांसाठी स्थानिक परिस्थिती, पारंपरिक वस्तीची रचना, सामाजिक व सांस्कृतिक वैशिष्ट्ये आणि मच्छीमार समाजाच्या पारंपरिक उपजीविकेचा विचार करणारी स्वतंत्र विकास नियंत्रण नियमावली अद्याप अस्तित्वात नाही. त्यामुळे नवीन नियमावली कोळीवाडे- गावठाणातील तोडक कारवाईला स्थगिती किंवा संरक्षण द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
प्रलंबित प्रश्नांसाठी नोडल एजन्सी
कोळीवाड्यांच्या प्रश्नांवर सर्व शासकीय व महापालिका अधिकाऱ्यांसह पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक आयोजित करून, एक नोडल अधिकारी अथवा नोडल एजन्सी नियुक्त करण्यात येईल, असे आश्वासन महापौरांनी दिले.
























































