
जुलैअखेर पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर कश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पाऊस झाल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान राजधानी दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने देशभरातील खासदार, अधिकारी आणि लोकांची गर्दी पहायला मिळत आहे. यादरम्यान राजधानी दिल्लीत आठ दिवसांत महिनाभराचा पाऊस पडल्याने पाणीच पाणी झाले आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिल्लीत २३०.१ मिमी पाऊस झाला असून, तो या महिन्याच्या २२६.८ मिमी सरासरी पर्जन्यमानापेक्षा जास्त आहे.
दिल्लीत २०२४ नंतर ऑगस्ट महिन्यात झालेला हा सर्वाधिक पाऊस आहे. कालिंदी कुंज बॉ र्डर, आयटीओ, प्रेस एन्क्लेव्ह रोडसह अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. राजस्थानमधील जयपूरमध्ये रविवारी सकाळी ६ ते ९ या वेळेत संततधार पाऊस झाला, ज्यामुळे सखल भागातील रस्त्यांवर ३-४ फूट पाणी साचले. घरांमध्येही पाणी शिरले. चुरू येथील वस्त्याही पाण्याखाली गेल्या.
हवामान विभागाने राज्यातील १९ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. १० ऑगस्टपासून पावसाचा जोर वाढू शकतो आणि त्याचा परिणाम १२-१३ ऑगस्टपर्यंत कायम राहील.
देशातील अनेक राज्यांत पावसाचा जोर
मध्य प्रदेशातील दिंडोरीमध्ये ६ इंच पावसाची नोंद झाली. नर्मदा नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे. रविवारी मध्य प्रदेशातील दातिया, रेवा आणि सिधी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. छत्तीसगडमध्ये मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, राज्याच्या बहुतांश भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस झाला. उत्तराखंडच्या बहुतांश भागांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या सरींची शक्यता आहे. हवामान विभागाने बागेश्वर, पिथोरगड आणि चमोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
दरम्यान, डेहराडून, टिहरी, रुद्रप्रयाग, नैनिताल आणि चंपावतमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. सोमवारी संपूर्ण राज्यासाठी मुसळधार पावसाचा इशाराही जारी करण्यात आला आहे. १४ ऑगस्टपर्यंत हवामान खराब राहील, अशी माहिती देण्यात आली. बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागांमध्ये १२ ऑगस्टपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. कश्मीरच्या अनेक भागांमध्ये पाऊस आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. राजौरीमध्ये एका १७ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला.

























































