आत्मविश्वास उंचावणारा हिंदुस्थानचा विजय; सराव सामन्यात श्रीलंका इलेव्हनवर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या अंतिम फेरीचे स्वप्न जिवंत ठेवण्यासाठी श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका जिंकणे हिंदुस्थानसाठी अत्यावश्यक मानले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर झालेल्या तीन दिवसीय सराव सामन्यात हिंदुस्थानने श्रीलंका क्रिकेट इलेव्हनवर 6 विकेट राखून मात करत दौऱयाची विजयी आणि आत्मविश्वास वाढवणारी सुरुवात केली.

या विजयात देवदत्त पडिक्कलचे नाबाद 142 धावांचे वादळी शतक, दुखापतीनंतर शुभमन गिलचे दमदार पुनरागमन, मोहम्मद सिराजची अखेरच्या टप्प्यातील तुफानी फटकेबाजी आणि रवींद्र जाडेजाची दोन्ही डावांतील अष्टपैलू कामगिरी ही वैशिष्टय़े ठरली.

श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने पहिला डाव 8 बाद 363 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात हिंदुस्थानी फलंदाजांनी जोरदार प्रतिकार केला. पडिक्कलने संयम आणि आक्रमकता यांचा सुरेख मेळ साधत नाबाद 142 धावा फटकावल्या. जाडेजाने 63, मानव सुथारने 41, तर गुरनूर ब्रारने अवघ्या 18 चेंडूंत 36 धावांची झंझावाती खेळी करत संघाला 6 बाद 357 धावांपर्यंत पोहोचवले.

दुसऱया डावात श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने 6 बाद 200 धावा करून हिंदुस्थानसमोर 207 धावांचे लक्ष्य ठेवले. ध्रुव जुरेल (17) आणि ऋषभ पंत (28) स्वस्तात बाद झाल्याने काहीशी चिंता निर्माण झाली होती. जाडेजाने 22 धावा केल्यानंतर निवृत्त होत माघार घेतली, तर गुरनूर ब्रार दोन धावांवर बाद झाला. मात्र त्यानंतर मोहम्मद सिराजने सामना एकतर्फी केला. अवघ्या 15 चेंडूंत 32 धावांची धडाकेबाज खेळी करत त्याने चार षटकार आणि एक चौकार लगावला. सिराजच्या या आक्रमक फटकेबाजीने हिंदुस्थानच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.

या सामन्यातील आणखी एक मोठा दिलासा म्हणजे, शुभमन गिलचे पुनरागमन. बोटाच्या दुखापतीमुळे दुसऱया दिवशी मैदानाबाहेर राहिलेला कर्णधार तिसऱया दिवशी फलंदाजीला उतरला आणि 54 चेंडूंत सात चौकारांसह 44 धावा करत लयीत असल्याचे दाखवून दिले. कसोटी मालिकेआधी गिलचे तंदुरुस्त होणे हिंदुस्थानसाठी अत्यंत सकारात्मक संकेत मानले जात आहेत. डब्ल्यूटीसीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी श्रीलंका मालिका निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे या सराव सामन्यातील विजयाने केवळ खाते उघडले नाही, तर संघाचे मनोधैर्यही उंचावले आहे. पडिक्कलचा फॉर्म, गिलचे पुनरागमन, जाडेजाची सातत्यपूर्ण कामगिरी आणि सिराजचा आक्रमक फिनिश या जोरावर हिंदुस्थान पहिल्या कसोटीत उंचावलेल्या आत्मविश्वासासह उतरणार हे निश्चित मानले जात आहे.