
अजिंक्य रहाणेने रोहित शर्माच्या 2027 वनडे विश्वचषकाबाबत निवड समिती सदस्यांना थेट आरसा दाखवला आहे. रोहित खेळणार की नाही हा प्रश्नच चुकीचा असल्याचे सांगत त्याने स्पष्ट शब्दांत मागणी केली की, रोहितला आताच 2027 विश्वचषकासाठी स्पष्ट हमी द्या. मग त्याच्याबाबत कोणतीही चर्चाच रंगणार नाही.
रहाणेच्या मते, रोहितसारख्या दिग्गजाला मालिकागणिक तोलणे म्हणजे त्याच्या योगदानाचा अपमान आहे. विश्वचषकासारख्या महासंग्रामात अनुभव हेच सर्वात मोठे शस्त्र असते. रोहितची गुणवत्ता सिद्ध करण्याची गरजच नाही, असा सणसणीत टोला त्याने लगावला.
रहाणेने मानसिक स्पष्टतेवरही जोर दिला. क्रिकेट हा लय आणि आत्मविश्वासाचा खेळ आहे. मोठय़ा खेळाडूच्या डोक्यात संभ्रम असेल तर सर्वोत्तम कामगिरी अपेक्षितच नाही, असे तो म्हणाला. त्यामुळे रोहितवर चर्चा थांबवा, निर्णय जाहीर करा आणि 2027 च्या विश्वचषक मोहिमेला आतापासूनच दिशा द्या, असा स्पष्ट संदेश रहाणेने दिला.



























































