
सर्वसामान्य जनतेला वेळेत उपचार मिळावेत यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागात महत्त्वाचे मानले जाते. परंतु चिंचणी येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडले आहे. याबाबत वारंवार आवाज उठवूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे नागरिकांची फरफट होत असून उपचारासाठी त्यांना तारापूर किंवा डहाणू गाठावे लागते.
चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात १७ गावे आणि १४ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. याठिकाणी एक प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्यावर एकूण ४२ हजार ३१७ नागरिक आरोग्य सेवेवर अवलंबून आहे. दररोज सुमारे ८५ ते ९० रुग्ण उपचारासाठी या केंद्रात येतात. मात्र वाढती लोकसंख्या आणि रुग्णसंख्या लक्षात घेता जुन्या आरोग्य केंद्राची क्षमता अपुरी पडत आहे. रुग्णांना दर्जेदार उपचार मिळावे यासाठी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम सुरू केले. मात्र गेल्या तीन वर्षांपासून हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम लटकले आहे.
जीव मुठीत घेऊन काम
सध्या सुरू असलेल्या जुन्या आरोग्य केंद्राची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या केंद्रात १६ ते १७ कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र रुग्णांसाठी केवळ दोनच बेड उपलब्ध असल्याने अनेकदा रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. तसेच याठिकाणी स्वच्छतागृहाची व्यवस्था नसल्याने रुग्णांसह कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होते. पावसाळ्यात तर इमारतीच्या छतातून पाणी गळते. येथील कर्मचारी जीव मुठीत घेऊन काम करत आहेत. रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करून नागरिकांना सुसज्ज आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



























































