रिक्षाचालकांना मराठी न आल्यास 16 ऑगस्टनंतर कारवाईचा बडगा उगारणार; परिवहनमंत्र्यांची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील रिक्षा तसेच टॅक्सीचालकांना मराठी आले नाही तर १६ ऑगस्टनंतर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. मराठी भाषा विभाग, मुंबई मराठी साहित्य संघ, राज्य मराठी विकास संस्था तसेच कोकण मराठी साहित्य परिषद या विविध संस्थांच्या माध्यमातून आतापर्यंत १ लाख रिक्षाचालकांना मराठीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे काम यापुढेही सुरू राहणार असून रिक्षा व टॅक्सीचालकांना प्रवाशांशी बोलताना मराठी आलीच पाहिजे, अशी भूमिका घेण्यात आली आहे. या इशाऱ्यानंतर अनेक रिक्षा-टॅक्सीचालकांनी मराठी भाषा शिकण्याची तयारी सुरू केली आहे.

ठाण्यासह राज्यात लाखोंच्या संख्ये ने रिक्षा तसेच टॅक्सीचालक आहेत. परिवहन विभागाने त्यांना मराठी भाषा सक्तीची केल्यानंतर अनेक ठिकाणी त्यास विरोध करण्यात आला. पण चालकांना प्रवाशांसोबत मराठी भाषेतून संवाद कसा साधायचा याबाबत प्रशिक्षण देण्याचे काम सुरू केले. त्यासाठी राज्यातील अनेक साहित्य संस्था पुढे सरसावल्या. चालकांसाठी तज्ज्ञांमार्फत छोटेखानी अभ्यासक्रम तयार केला असून प्रशिक्षणदेखील सुरू झाले. राज्यभर राबवण्यात आलेल्या या अभियानाला मोठा प्रतिसाद मिळाला असून आतापर्यंत १ लाखाहून अधिक अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालकांनी व्यावहारिक मराठीचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.

यशस्वीपणे मराठीचे प्रशिक्षण घेणाऱ्या रिक्षा-टॅक्सीचालकांना १७ ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतनमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रमाणपत्रे दिली जाणार आहेत. समोरचा चालक हिंदी भाषिक आहे असे गृहित धरून मराठी प्रवाशांनी हिंदीत संवाद साधू नये. मराठी भाषिकांनी मराठीतच संवाद साधल्यास मराठीचा वापर अधिक वाढेल. मराठीचा सन्मान राखण्याची जबाबदारी केवळ चालकांचीच नाही तर प्रत्येक मराठी नागरिकाची असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.

आरटीओ अधिकारी पडताळणी करणार

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून दिले जाणारे प्रमाणपत्र हे अभियानात सहभाग घेतल्याचे प्रमाणपत्र आहे. मात्र केवळ प्रमाणपत्र दाखवल्यामुळे कारवाई टळणार नाही. आरटीओ अधिकारी चालकांशी मराठीत संवाद साधतील. त्या संवादामध्ये चालकाला मराठीत उत्तर देता आले तरच त्याने नियमांचे पालन केल्याचे मानले जाईल. अन्यथा संबंधित चालकावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे. समोरचा चालक हिंदी भाषिक आहे असे गृहित धरून मराठी प्रवाशांनी हिंदीत संवाद साधू नये. मराठी भाषिकांनी मराठीतच संवाद साधल्यास मराठीचा वापर अधिक वाढेल. मराठीचा सन्मान राखण्याची जबाबदारी केवळ चालकांचीच नाही तर प्रत्येक मराठी नागरिकाची असल्याचे स्पष्ट करण्यात आले.