
सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात भलेमोठे झाड कोसळून जव्हारच्या पिपुर्णा येथील जिल्हा परिषद शाळेच्या स्वयंपाकघराचे प्रचंड नुकसान झाले. मात्र या घटनेला आज १५ दिवस उलटले तरी दुरुस्तीच्या नावाने बोंबच असल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांची चूल ‘विझली’ असून पोषण आहार शिजवण्यासाठी शिक्षकांना रोजच शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे विनवण्या कराव्या लागत आहेत. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही प्रशासन कानाडोळा करत असल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
जव्हार तालुक्यातील पिपुर्णा येथील जिल्हा परिषद शाळेत ८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग येथे असून मुलांचे कुपोषण होऊ नये तसेच चांगले अन्न मिळावे यासाठी शाळेच्या आवारातच स्वयंपाकघर बांधून पोषण आहार शिजवला जातो. मात्र १५ दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात या स्वयंपाकघरावर झाड कोसळल्याने किचनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र झाड पडून १५ दिवस झाले तरीही जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता तसेच जव्हार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. त्यातच जेवण बनवण्यासाठी जागा नसल्याने विनंती करून शिक्षक दुसरीकडून सध्या पोषण आहार शिजवत आहेत. मात्र प्रशासनाच्या या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहार वेळेवर आणि सुरक्षित पद्धतीने मिळेल का, असा सवाल पालकांनी केला आहे.
तातडीने पर्यायी व्यवस्था करा
‘स्वयंपाकघराची कायमस्वरूपी दुरुस्ती होईपर्यंत तात्पुरती पत्र्याची शेड उभारून देण्यात यावी तसेच ८० विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि पोषण आहाराशी संबंधित प्रश्न असल्याने प्रशासनाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून कार्यवाही करावी,’ अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अजय सुतार यांनी केली आहे. दरम्यान जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन स्वयंपाकघराची दुरुस्ती किंवा पर्यायी व्यवस्था त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालक व ग्रामस्थांकडून होत आहे.



























































