
ज्येष्ठ नेते आणि शिक्षणमहर्षी डी. वाय. पाटील आणि साहित्यिक श्रीनिवास पुलकर्णी यांना महापालिका सभागृहात आज श्रद्धांजली वाहण्यात आली. या शोकप्रस्तावासाठी सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. मुख्य समित्यांचे मोजके अध्यक्ष आणि काही नगरसेवक वगळता भाजपच्या बहुतांशी नगरसेवकांची बाके रिकामीच होती.
महापालिकेत दिवंगत लोकप्रतिनिधी आणि महनीय व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्याची परंपरा आहे. त्यानुसार डी. वाय. पाटील यांच्या निधनानिमित्त शोकप्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र या अत्यंत संवेदनशीलप्रसंगी भाजपचे अनेक नगरसेवकांनी सभागृहात उपस्थित नव्हते. याबद्दल विरोधकांनी नाराजी व्यक्त केली.
‘शोकप्रस्ताव हा राजकीय मतभेदांच्या पलीकडचा आणि सभागृहाची प्रतिष्ठा जपणारा औपचारिक कार्यक्रम असतो. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन दिवंगत आत्म्याला आदरांजली वाहिली जाण्याची परंपरा आहे, मात्र आज सत्ताधारी भाजपचे एक तृतीयांश नगरसेवकही सभागृहात नव्हते. सत्ताधाऱयांच्या या बेफिकिरीमुळे परंपरेला तडा गेला आहे,’ असे महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या.




























































