आठवड्याची सुरुवात लोकलच्या गोंधळाने, पश्चिम रेल्वेवर तीन स्थानकांत तांत्रिक बिघाड; मुलुंड येथील स्पार्किंगमुळे मध्य रेल्वे कोलमडली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रविवारच्या साप्ताहिक सुट्टीनंतर कामावर निघालेल्या नोकरदारांचे सोमवारी लोकल ट्रेनच्या प्रवासात प्रचंड हाल झाले. पश्चिम रेल्वे मार्गावर तीन स्थानकांत तांत्रिक बिघाड झाला आणि लोकल सेवेचे वेळापत्रक ऐन ‘पीक अवर्स’ला पूर्णपणे कोलमडले. त्याचा परिणाम दुपारपर्यंत कायम राहिला. अप आणि डाऊन दोन्ही दिशेने धावणाऱ्या लोकल गाड्यांना तब्बल ३० ते ४० मिनिटांचा विलंब झाला. पश्चिम रेल्वेच्या गोंधळापाठोपाठ मध्य रेल्वेची सेवा मुलुंड येथील स्पार्किंगमुळे विस्कळीत झाली. या गोंधळात लाखो प्रवाशांचे हाल झाले.

 

सुरुवातीला वसई रोड स्थानकात पहाटे ४.४६ वाजण्याच्या सुमारास दिवा डाउन/अप जलद मार्गावरील ‘पॉइंट १११/११२’मध्ये बिघाड झाला. त्याचा परिणाम विरारहून चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल ट्रेनच्या सेवेवर झाला. त्यापाठोपाठ वर्दळीच्या दादर स्थानकात सकाळी १०.१० वाजता दोन्ही दिशेकडील जलद मार्गावर पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्या बिघाडाला काही मिनिटे होत नाही तोच गोरेगाव येथे १० वाजून २२ मिनिटांच्या आसपास अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील पॉइंटमध्ये बिघाड झाला.

 

ओव्हरहेड वायरवर पडला तारेचा तुकडा
मध्य रेल्वे मार्गावर मुलुंड स्थानकाजवळ डाऊन मार्गिकेवर ओव्हरहेड वायरला आग लागली. सकाळी ११.५३ वाजता ओव्हरहेड वायरवर तारेचा तुकडा पडल्याने मोठे स्पार्किंग झाले आणि प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली. या आगीपासून स्थानक परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. याचा परिणाम संपूर्ण लोकलसेवेवर झाला. सीएसएमटी-अंबरनाथ ही जलद उपनगरी गाडी ११.५३ वाजता मुलुंड स्थानकात आली होती.

 

ठिकठिकाणी ट्रेनच्या लांबलचक रांगा
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक बिघाडाचा सामना प्रवाशांना करावा लागला. दादर रेल्वे स्थानकाजवळील बिघाडामुळे चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकल माटुंगा व माहीमदरम्यान खोळंबल्या. तसेच ग्रांट रोड आणि चर्चगेटदरम्यान लोकल ट्रेनच्या लांबलचक रांगा लागल्या होत्या. यावेळी अनेक प्रवाशांनी गाडीतून उतरून बस प्रवास करून कार्यालय गाठले.