परकीय शक्तींकडून हिंदुस्थानला थांबवण्याचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
file photo

हिंदुस्थानची सर्वच क्षेत्रात घोडदौड सुरू आहे. उद्या हिंदुस्थान जगातील महाशक्ती बनेल अशा भीतीमुळे काही परकीय शक्ती हिंदुस्थानला थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र तिरंगा हाती घेऊन निघालेल्या तरुणाईला कुणीही रोखू शकणार नाही, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला.

१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने मुंबईत आयोजित तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीस सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी देशभक्तीपर गीतही गायले. आज दोन सागर पाहायला मिळत आहेत, एकीकडे हिंद महासागर आणि दुसरीकडे तिरंगा महासागर, अशा शब्दांत त्यांनी रॅलीचे कौतुक केले.

हिंदुस्थान जगातील चौथी आर्थिक महासत्ता बनला आहे. माहिती तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये जगातील सगळ्यांशी हिंदुस्थान मुकाबला करतो. इतकेच नव्हे तर सर्वाधिक युवावर्ग आज हिंदुस्थानात आहे आणि तिरंगा हाती घेऊन पुढे निघालेल्या या तरुणाईला थांबवण्याची ताकद परकीय शक्तींमध्ये नाही, असे फडणवीस म्हणाले.

९ ऑगस्ट १९४२ ची क्रांती ‘भारत छोडो’ची होती, आताची क्रांती ‘करो या मरो’ची आहे, विकसित हिंदुस्थानची आहे, आताची क्रांती हिंदुस्थानविरोधी शक्तीला हिंदुस्थान छोडो म्हणायची आहे, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनासाठी शुभेच्छा दिल्या.