
प्रेयसीला दुचाकीवरून कळंब समुद्रकिनारी फिरायला जात असताना दुचाकी पुलाच्या कठड्यावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. तर १९ वर्षीय तरुणी गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात रविवारी घडला.
इब्राहिम शेख हा नालासोपारा येथील बिलाल पाडा परिसरात राहात होता. विक्रोळी येथे राहणारी त्याची मैत्रीण स्नेहा गायकवाड रविवारी त्याला भेटण्यासाठी नालासोपारा येथे आली होती. त्यानंतर इब्राहिम स्नेहाला सोबत घेऊन दुचाकीवरून कळंब समुद्रकिनारी फिरण्यासाठी निघाला. सकाळी ११ वाजता दोघेही कळंब ते निर्मळ या मार्गाने जात असताना कळंब पुलावर इब्राहिमचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील दुचाकी थेट पुलाच्या कठड्याला जाऊन धडकली. या अपघातात इब्राहिम आणि स्नेहा दोघेही गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी नालासोपारा येथील पालिकेच्या डी. एम. पेटिट रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रविवारी रात्री इब्राहिमचा मृत्यू झाला. तर स्नेहा गंभीर जखमी असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
































































