माणगावमध्ये इको कार थेट दुकानात घुसली, सीसीटीव्हीत धक्कादायक प्रकार कैद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माणगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून रिव्हर्स गिअरमध्ये असलेली इको कार अचानक सुरू झाल्याने ती थेट दुकानात घुसल्याची घटना घडली आहे. माणगाव शहरातील कचरी रोड परिसरातील वंदना सोसायटी येथे ही घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

एका १६ वर्षांच्या मुलाकडून चुकून कार सुरू झाली. कार त्यावेळी रिव्हर्स गिअरमध्ये असल्याने इंजिन सुरू होताच कार अचानक मागच्या दिशेने वेगाने सरकली. कारचालकाला परिस्थिती नियंत्रणात आणण्याची संधी मिळण्यापूर्वीच कार मागे जात थेट कचरी रोडवरील शोभा जनरल स्टोअर्स या दुकानात घुसली. कारने दुकानाच्या दर्शनी भागाला जोरदार धडक दिल्याने दुकानातील साहित्याचे नुकसान झाले. अचानक झालेल्या या धडकेमुळे परिसरात मोठा आवाज झाला आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

निष्काळजीपणा भोवला

सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार काही क्षणातच दुकानाच्या दिशेने वेगाने मागे जात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. कारच्या मार्गात कोणीही व्यक्ती नसल्याने मोठी जीवितहानी टळली. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी काही क्षणांचा निष्काळजीपणा किती मोठा अपघात घडवू शकतो, याचा धक्कादायक प्रत्यय या घटनेतून समोर आला आहे.