
उल्हासनगर शहरात डेंग्यूचे तब्बल ३० संशयित रुग्ण आढळले आहेत. डेंग्यूसोबतच मलेरिया, चिकनगुनिया, टायफाईड आणि डायरियासारख्या आजारांनीदेखील विळखा घातला असून सरकारी रुग्णालयांबरोबरच खासगी दवाखानेही रुग्णांनी ओव्हर पॅक झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे अलर्ट मोडवर आलेल्या आरोग्य विभागाने जनजागृतीबरोबरच औषध फवारणी सुरू केली आहे.
शहरातील खासगी प्रयोगशाळांकडून संकलित करण्यात आलेल्या माहितीत डेंग्यूचे तब्बल ३० संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मलेरिया, चिकनगुनिया, टायफाईड आणि डायरियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य सभापती सविता तोरणे-रगडे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सत्यम गुप्ता यांच्या उपस्थितीत आजारांची सद्यस्थिती आणि संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
नागरिकांना आवाहन
घराच्या आजूबाजूला साचलेले पाणी, पाण्याच्या टाक्या, कुंड्या, टायर तसेच अन्य ठिकाणी डासांची पैदास होणार नाही यासाठी नियमित तपासणी करण्यावर भर देण्यात येणार आहे. नागरिकांनीही आठवड्यातून किमान एकदा घरातील पाणी साठवण्याची भांडी रिकामी करून स्वच्छ करावीत, परिसरात पाणी साचू देऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
































































