चंद्रपुरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस, 52 जणांचा घेतला चावा; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

चंद्रपूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या समस्येने भयानक रूप धारण केले असून नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. शहरातील तुकुम परिसरात एका मोकाट कुत्र्याने तब्बल 52 नागरिकांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर समस्येकडे महानगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिवसेना आक्रमक झाली आहे.

नागरिकांच्या वाढत्या तक्रारींनंतर मनपा प्रशासनाकडून कुत्रे पकडण्यासाठी वाहन पाठवले जाते. मात्र, पकडलेल्या कुत्र्यांना काही वेळातच पुन्हा त्याच परिसरात आणून सोडले जाते. परिणामी, तुकुम परिसरात मोकाट कुत्र्यांच्या टोळ्या वाढल्या असून नागरिकांना घराबाहेर पडताना हातात काठी घेऊन फिरावे लागत आहे. त्यामुळे या समस्येवर तात्पुरती मलमपट्टी न करता कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. या समस्येवर शिवसेना पक्षाचे माजी नगरसेवक सुरेश पचारे आणि युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्त अकनूरी यांना निवेदन देण्यात आले.

दरम्यान, निवेदन स्वीकारताना मनपा आयुक्त अकनूरी यांनी, संबंधित भागातील सर्व कुत्र्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे, त्यामुळे यापुढे पालिका काही करू शकत नाही, असे उत्तर दिल्याचा आरोप सुरेश पचारे यांनी केला आहे. आयुक्तांच्या या अकार्यक्षम भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर मनपाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेने दिला आहे.