
ब्रेथ अॅनलायझर मशिनमध्ये फूंक मारल्यावर ०.१ मिलिग्राम अतिरिक्त दारू आढळल्याने विद्यार्थ्यांचे करीअर उद्ध्वस्त करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे.
नाकाबंदीत पोलीस संशयित वाहनचालकाला या मशिनमध्ये फूंक मारायला सांगतात. या परीक्षणात ३० मिलिग्राम प्रति १०० मिलिलिटरमध्ये दारू आढळल्यास दारू पिऊन वाहन चालवल्याचा गुन्हा होत नाही, पण यापेक्षा अधिक दारू आढळल्यास फौजदारी कारवाई केली जाते.
जून महिन्यात २५ वर्षीय विद्यार्थी दारू पिऊन गाडी चालवत असल्याचा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी त्याला ब्रेथ अॅनलायझर मिशनमध्ये फूंक मारायला सांगितले. या परीक्षणात मर्यादेपेक्षा ०.१ मिलिग्राम अधिक दारू आढळली. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी या विद्यार्थ्याने याचिका दाखल केली.
न्या. अश्विन भोबे यांच्या एकल पीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. हा विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जाणार आहे. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. ब्रेथ अॅनलायझर परीक्षणात ०.१ मिलिग्राम अधिक दारू आढळल्याने विद्यार्थ्यांचे करीअर उद्ध्वस्त करता येणार नाही. तेव्हा हा गुन्हा रद्द केला जात आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
रक्त चाचणी केली नाही
या विद्यार्थ्याची रक्त किंवा लघवी चाचणी पोलिसांनी केली नाही. तो भरधाव अथवा निष्काळजीपणे गाडी चालवत होता, असाही आरोप नाही. अशा परिस्थितीत हा गुन्हा रद्द न केल्यास न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग केल्यासारखे होईल, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
































































