‘शाळा ठीक करा’, स्वातंत्र्यदिनापासून नवीन अभियानाची सुरुवात – अभिजीत दीपके

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गावा गावांमधील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP)चे संस्थापक अभिजीत दीपके हे स्वातंत्र्यदिनी ‘शाळा ठीक करा’ अभियान सुरू करणार आहेत. गावांतील सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागू नये, यासाठी हे अभियान राबवण्यात येणार असल्याचे दीपके यांनी बुधवारी सांगितले.

दीपके यांनी सोमवारी देशव्यापी अभियानाची घोषणा केली होती. त्यानंतर बुधवारी या अभियानाचे नाव जाहीर करण्यात आले. ‘एक्स’वरील पोस्टमध्ये दीपके यांनी म्हटले की, “स्वातंत्र्याला 80 वर्षे झाल्यानंतरही गावांतील मुलांना शाळेत मूलभूत सुविधांसाठी विनवणी करावी लागू नये.”

“देश म्हणून ग्रामीण भागातील मुलांच्या बाबतीत आपण अत्यंत वाईट पद्धतीने अपयशी ठरलो आहोत. या स्वातंत्र्यदिनी CJP गावांमधील सरकारी शाळांची स्थिती सुधारण्यासाठी ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू करणार आहे,” असेही त्यांनी म्हटले.

सरपंच आणि पालकांना पुढाकार घेण्याचे आवाहन
गावांतील सरकारी शाळांच्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी सरपंच आणि पालकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन दीपके यांनी केले आहे. मुलांना आवश्यक मूलभूत सुविधा मिळवून देणे ही सामाजिक आणि नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी म्हटले.

15 ऑगस्ट रोजी देशाच्या 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नागरिकांनी या अभियानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आपल्या स्वतःच्या गावापासून या अभियानाची सुरुवात करणार असल्याचे दीपके यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हिंगोली येथे सरपंचाची भेट घेऊन सरकारी शाळांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओ संदेशात दीपके यांनी गेल्या 80 वर्षांत गावांमधील सरकारी शाळांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला. मोठ्या शहरांमधील विद्यार्थ्यांना ज्या सुविधा मिळतात, त्या ग्रामीण भागातील मुलांना अद्याप का मिळत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

“लहान मुलींसाठी ही परिस्थिती किती कठीण असेल. त्यामुळे या 15 ऑगस्टला आपण कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे असेल, तर सरकारी शाळांमध्ये सुधारणा करून नव्याने सुरुवात करण्याकडे लक्ष दिले पाहिजे,” असे दीपके यांनी म्हटले.