
मुंबईसाठी मंगळवारची रात्र काळरात्र ठरली. कुर्ला पश्चिम येथील अशोक नगरमधील चाळीवर डोंगराचा भाग कोसळून दगडमातीच्या ढिगाऱ्याखाली 8 जण ठार, तर चारजण जखमी झाले. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य सुरू होते. दरम्यान, विलेपार्ले येथे टॉवरमध्ये आग लागून दोघांचा मृत्यू झाला.
मंगळवारी मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. पावसामुळे घाटकोपरच्या गौशिया चाळीवर बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास डोंगराचा भाग कोसळला. यात तीन घरांचे नुकसान झाले. डोंगरवर असलेल्या सर्वात वरच्या घरावर पिंपळाचे झाड पडले. त्यामुळे भूस्खलन होऊन त्या घराचा भाग आणि मातीचा ढिगारा खालच्या घरांवर पडला. पाऊस आणि अंधारामुळे सुरुवातीला काय झाले ते लोकांना समजले नाही. एकच हाहाकार उडाला. काही क्षणांत होत्याचे नव्हते झाले. घरांमध्ये गाढ झोपेत असलेली कुटुंबे गाडली गेली. एका कुटुंबातील चार जणांचा जीव गेला, तर आजूबाजूच्या घरातील आणखी चार जण मरण पावले. मृतांमध्ये दोन बालकांचा समावेश आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना रात्री उशिरापर्यंत बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
दुर्घटनेत महापौर रितू तावडे यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि प्राण गमावलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या वारसाला चार लाख रुपायांची तातडीची आर्थिक मदत तर जखमी झालेल्या व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांची वैद्यकीय मदत देण्याची घोषणा महापौर रितू तावडे यांनी केली.
दुर्घटनेत जखमी सोहेल अन्सारी, मोहम्मद अन्सारी, नईमुद्दीन खान, साजित अन्सरी यांना उपचारासाठी कुर्ला येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले.
शिवसैनिक मदतीला धावले
कुर्ला येथील गौशिया चाळीवर पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याचे समजताच शिवसैनिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना भाभा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शिवसेनेचे ईशान्य मुंबई विभाग प्रमुख सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिव आरोग्य सेना मुंबई जिल्हा सहसमन्वयक प्रकाश वाणी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सेना राज्य सचिव सचिन भांगे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींना पूर्ण सहकार्य करण्याची विनंती डॉक्टरांना केली.
मृतांची नावे
मोहम्मद समीर अन्सारी (14), साहिल हुसेन अब्दुल काझी (19), अबान शेख (2), मन्नत शेख (4), मरजीना शेख (27), मोहम्मद आरिफ, विकेत यादव (27) अशी मृतांची नावे असून एकाची ओळख पटली नाही.
दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या भागात पावसाळ्यापूर्वीच नोटीस देऊन सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचा सल्ला दिला जातो. टेकडी क्रमांक 3, अशोक नगर येथील नागरिकांनाही यापूर्वी सूचना देण्यात आली होती, असा दावा पालिकेने केला.
अरुंद बोळ, डोंगराला चिकटून घरे… बचावकार्यात अडथळे
अग्निशमन दल, एनडीआरएफ, पोलीस आणि पालिकेच्या पथकांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. मात्र डोंगराखालील एकमेकांना चिकटून असलेली घरे, अरुंद बोळ यामुळे बचाव पथकांना आत पोचायला अडचणी येत होत्या. दगडाचे ढीग हटवण्यासाठी मोठी यंत्रसामग्री किंवा जेसीबीसारख्या मशीन आत नेता येत नव्हत्या. त्यामुळे बचावकार्याला विलंब लागत होता. त्यामुळे दुर्घटनेतून बचावलेल्या नातेवाईकांनी टाहो फोडला. आमच्या माणसाला लवकर बाहेर काढा, यासाठी आक्रोश केला.































































