
दरवाजात उभे राहण्याच्या वादातून मयंक लोहार या तरुणाची हत्या झाली होती. त्याच्या हत्येप्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी रोशन सुवर्णा याच्या विरोधात 1100 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. पोलिसांनी एकूण 68 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत.
मयंक हा मूळचा विरारचा रहिवासी होता. तो अंधेरी येथील एका शॉपमध्ये काम करत होता. 24 जूनला मयंकने नेहमीप्रमाणे अंधेरी येथून लोकल पकडली. त्या वेळेस पाऊस पडत होता. लोकल जोगेश्वरी-गोरेगाव दरम्यान असताना दरवाजात उभे राहिलेल्या रोशन सुर्वणासोबत वाद झाला. धावत्या लोकलमध्ये रोशनने मयंकची चाकू मारून हत्या केली. हत्या केल्यानंतर रोशन हा पळून गेला होता. अखेर बोरिवली रेल्वे पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणी बोरिवली रेल्वे पोलिसांनी तपास करून सुमारे 1100 पानांचे आरोपपत्र बोरिवली न्यायालयात सादर केले.
आरोपपत्रात पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजदेखील जोडले आहे. तसेच पोलिसांनी एकूण 68 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. पोलिसांनी मयंकच्या कुटुंबीयांचेदेखील जबाब नोंद केले आहेत. तसेच पोलिसांनी रोशनच्या मित्राचा देखील जबाब नोंदवल्याचे समजते. रोशनचे कपडे आणि मयंकचे कपडे तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवले होते. त्याचा अहवालदेखील दोषारोपपत्रात जोडला आहे. घटनेच्या वेळी काही प्रत्यक्ष साक्षीदाराने काढलेल्या व्हिडीओच्या सत्यतेबाबत अहवाल आला नाही. तो अहवाल आल्यानंतर तो न्यायालयात सादर केला जाणार आहे. पोलिसांनी प्रथम वर्गातील डब्यातील एका प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदवला आहे.





























































