
कुंभमेळा कामासाठी 591 कोटींच्या बनावट वर्कऑर्डर दिल्याप्रकरणी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या नातलगासह दोघांना जामनेरमधून अटक करण्यात आली आहे. तीन कंत्राटदारांकडून या टोळीने तीन कोटी उकळल्याचे उघड झाले आहे. सहाजणांचा शोध सुरू आहे.
कुंभमेळा बंदोबस्तासाठी येणारे पोलीस व राज्य राखीव दलाच्या जवानांना जेवण, चादरी, चटया यासह इतर साहित्य पुरविण्याचे कंत्राट देण्याच्या नावाखाली बनावट वर्कऑर्डर दिल्याची माहिती दोन दिवसांपूर्वी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती. मंगळवारी रात्री नाशिक पोलिसांनी महाजन यांच्या जामनेर गावातून तनय महाजन (32), नरेंद्र महाजन (51) या दोघांना ताब्यात घेतले. यातील तनय हा महाजन यांचा नातलग आहे. तीन कंत्राटदारांना बनावट वर्कऑर्डर देऊन त्यांच्याकडून तीन कोटी पाच लाख रुपये वेळोवेळी बँक खात्याच्या माध्यमातून उकळल्याचा गुन्हा या दोघांविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. साथीदार शकील अहमद सलीम्मुद्दीन शेख याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
हा योगायोग कसा?
अटक करण्यात आलेल्या दोघांपैकी एक मंत्री महाजन यांचा नातलग असून, दोघेही त्यांच्याच जामनेर गावातील आहेत. हा योगायोग कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गंडा घालणाऱ्या सर्वांवर कारवाई होणार
पोलिसांनी या प्रकरणात सात-आठजण असल्याचे सांगितले आहे. यातील एकजण माझा दूरचा नातेवाईक आहे. ग्रामसेवक, तलाठ्याची नोकरी लावून देतो, असे सांगूनही काहींनी गोरगरीबांना लुटले आहे, त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.

























































