
मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड आणि कर्जत रेल्वे स्थानकादरम्यान आज मालगाडीच्या ब्रेक पाइपमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दीड तास लोकल सेवा ठप्प झाली. सकाळी ऐन गर्दीच्या वेळी ‘मरे’चा लोच्या झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या बिघाडाचा परिणाम कर्जत-मुंबई दिशेने धावणाऱ्या प्रवासी गाड्यांसह डाऊन मार्गावरील मेलएक्सप्रेस गाड्यांवरही झाला. तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर दीड तासाने लोकल सेवा सुरळीत झाली.
सकाळी भिवपुरी रोड आणि कर्जत स्थानकादरम्यान पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या माल गाडीच्या ब्रेक पाइपमध्ये बिघाड होऊन पाइप फुटला. त्यामुळे मालगाडी मार्गातच थांबली. परिणामी डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. कर्जतच्या दिशेने जाणारी लोकल भिवपुरी रोड स्थानकात थांबविण्यात आली. तर त्यापाठोपाठ येणारी नेरळ स्थानकात थांबून राहिली. नेरळ स्थानकातील ट्रेन सवा बाराच्या सुमारास मुंबई दिशेने रवाना झाली.
लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम
दुसरीकडे नेरळ आणि वांगणी परिसरातही काही मालगाड्या थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवरही या बिघाडाचा परिणाम झाला. दरम्यान, रेल्वेच्या तांत्रिक विभागाने युद्धपातळीवर काम करत मालगाडीच्या ब्रेक पाइपची दुरुस्ती दुपारी १ वाजता पूर्ण केली. त्यानंतर मालगाडी पुण्याच्या दिशेने रवाना करण्यात आली. भिवपुरी रोड स्थानकात थांबविण्यात आलेली लोकलही कर्जतच्या दिशेने रवाना करण्यात आली.






























































