
उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेसच्या ‘विजय शंखनाद’ सभेनंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ज्या मंचावरून जनतेला संबोधित केले, त्या मंचाचे हिंदू संघटनांकडून कथित ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. या प्रकारावर उत्तराखंड काँग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपवर जातीय भेदभाव आणि संकुचित मानसिकतेचा आरोप केला आहे.
एबीपी न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार ८ ऑगस्ट रोजी हल्द्वानी येथे काँग्रेसच्या ‘विजय शंखनाद’ सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, उत्तराखंडच्या काँग्रेस प्रभारी कुमारी सेलजा तसेच विरोधी पक्षनेते यशपाल आर्य यांच्यासह पक्षाचे अनेक नेते उपस्थित होते. सभेनंतर ‘श्री राम सेना चॅरिटेबल सर्व्हिस ट्रस्ट’ या हिंदू संघटनेशी संबंधित कार्यकर्त्यांनी सभेच्या मंचाचे शुद्धीकरण केल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी वैदिक मंत्रोच्चारांसह पूजा आणि यज्ञ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. खरगे यांनी भाषण केलेल्या मंचावरच हा विधी करण्यात आल्याने या प्रकारावरून काँग्रेसने आक्षेप घेतला आहे.
उत्तराखंड काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गोडियाल यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, हल्द्वानीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ज्या मंचावरून जनतेला संबोधित केले, त्याच मंचाचे भाजपशी संबंधित लोकांकडून करण्यात आलेले ‘शुद्धीकरण’ अत्यंत वेदनादायी आणि निंदनीय आहे. गोडियाल यांनी हा प्रकार भाजपच्या कथित जातीय भेदभावाचे आणि संकुचित वृत्तीचे प्रदर्शन असल्याचा आरोप केला. अशा कृतींमुळे समाजात द्वेष आणि विभाजनाला प्रोत्साहन मिळते, असेही त्यांनी म्हटले.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. नैनितालच्या वरिष्ठ पोलीस अधीक्षकांनी या घटनेची दखल घ्यावी आणि कायद्याचे उल्लंघन झाले असल्यास संबंधितांवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी गोडियाल यांनी केली. गोडियाल यांनी पुढे म्हटले की, लोकशाहीमध्ये जातीय भेदभावाला कोणतेही स्थान नाही. काँग्रेस अशा कथित संकुचित मानसिकतेचा लोकशाही आणि घटनात्मक मार्गाने विरोध करत राहील.


























































