घणसोलीच्या क्लस्टरला महापौरांची स्थगिती, नवी मुंबईत भाजपचा शिंदे गटाला झटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घणसोली येथील सिम्प्लेक्स सोसायटीच्या क्लस्टरमधून होणाऱ्या पुनर्विकासाला नवी मुंबई पालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी स्थगिती दिली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे नवी मुंबईत शिंदे गटाला जोरदार झटका बसला आहे. क्लस्टरमधून होणाऱ्या पुनर्विकासामुळे मूळ रहिवाशांवर अन्याय होऊन बिल्डर मालामाल होत असल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला आहे.

घणसोलीतील सिम्प्लेक्स सोसायटी ही माथाडी कामगारांची वस्ती आहे. सुमारे तीन हजार २०० कुटुंबे या ठिकाणी वास्तव्य करतात. या सोसायटीचा पुनर्विकास क्लस्टर योजनेतून करण्यास महापालिकेने मंजुरी दिली होती. मात्र अशा पद्धतीने जर विकास झाला तर त्याचा मोठा परिणाम शहरावर होईल हे लक्षात घेऊन सभागृहनेते सागर नाईक यांनी सिम्प्लेक्स सोसायटीच्या पुनर्विकासाबाबत चर्चा करण्यासाठी एक प्रस्ताव महासभेच्या पटलावर ठेवला. या प्रस्तावावर दोन दिवस वादळी चर्चा झाली. सिम्प्लेक्स सोसायटीमध्ये सध्या तीन हजार २०० घरे आहेत. मात्र जर या सोसायटीचा विकास क्लस्टरमधून झाला तर तिथे दहा हजार घरांची निर्मिती होणार आहे. या भागावर सुमारे सहा हजार ८०० घरांचा अतिरिक्त बोजा पडणार असल्याने पायभूत सुविधांवर मोठा ताण पडणार आहे, असे नगरसेवकांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

नवी मुंबईचे ठाणे करू नका
नवी मुंबई हे नियोजनबद्ध शहर आहे. या शहरात वाहनांची क्षमता लक्षात घेऊन अतिरिक्त बांधकामांना परवानगी देणे आवश्यक आहे. दाटीवाटीत इमारती उभ्या करून नवी मुंबईचे ठाणे करू नका, असा टोला सागर नाईक यांनी शिंदे गटाला लगावला.