लाचखोर जीएसटी उपायुक्तावर झडप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्यावसायिकाकडे आठ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जीएसटीचे उपायुक्त दीपक रामचंद्र क्षीरसागर यांना अटक केली आहे. क्षीरसागर यांनी या व्यावसायिकाकडे चौकशी बंद करण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी केली होती. नंतर हा सौदा आठ लाखांवर पक्का झाला होता. याप्रकरणी सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेसर्स विधी इंडस्ट्रीजच्या माध्यमातून स्क्रॅपचा व्यवसाय केला जातो. या व्यवसायासंदर्भात जीएसटी क्रमांकाची छाननी सुरू होती. तसेच जीएसटी क्रेडिटच्या अनुषंगाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. ही चौकशी बंद करण्यासाठी क्षीरसागर यांनी तक्रारदाराकडे १५ लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी संबंधित व्यावसायिकाने एसीबीकडे तक्रार केली. त्यानुसार एसीबीने क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.