
ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमध्ये वैद्यकीय व्यवसायाच्या नावाखाली गुपचूप धंदा करणाऱ्या बोगस डॉक्टरांना लवकरच कारवाईचे इंजेक्शन देण्यात येणार आहे. बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला असून वैद्यकीय पात्रता तपासण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. लवकरच विशेष पथकांद्वारे ही शोधमोहीम हाती घेण्यात येणार आहे.
ठाणे जिल्हातील खासगी डॉक्टरांची नियमित माहिती गोळा करून त्यांची वैद्यकीय पात्रता तपासण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी आणि संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. गेल्या वर्षभरात बोगस वैद्यकीय व्यावसायिकांच्या कारवाईचा जिल्हाधिकारी पांचाळ यांनी आढावा घेतला. त्यानंतर शहापूर व मुरबाड परिसरात बोगस डॉक्टरांविरुद्ध पोलिसांशी समन्वय साधून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले.





























































