
दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ नोव्हेंबर 2025 मध्ये झालेल्या स्फोटामागे अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) विश्लेषणात्मक समर्थन आणि निर्बंध देखरेख पथकाच्या 38व्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. या हल्ल्यात 11 जणांचा मृत्यू झाला होता. टाइम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिले आहे.
संयुक्त राष्ट्रांचा हा अहवाल 10 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आला. त्यात AQIS ही संघटना पूर्वीच्या विखुरलेल्या स्वरूपातून आता प्रादेशिक दहशतवादी संघटनेच्या रूपात विकसित होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. संघटनेने आर्थिक नेटवर्क उभारले असून मोठ्या गटांऐवजी लहान, विखुरलेल्या आणि विकेंद्रित गटांच्या माध्यमातून काम करण्याची पद्धत स्वीकारल्याचे अहवालात म्हटले आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या हल्ल्याची अधिकृतपणे AQISशी जोडणी करण्यात आली आहे, असेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
यापूर्वी जैश-ए-मोहम्मदवर संशय
लाल किल्ल्याजवळील स्फोटासाठी यापूर्वी पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेशी संबंध जोडला जात होता. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालातही एका सदस्य देशाने झालेल्या काही हल्ल्यांसाठी JeMला जबाबदार धरल्याचे आणि लाल किल्ल्याजवळील स्फोटाचाही संबंध या संघटनेशी जोडल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या हल्ल्याच्या जबाबदारीबाबतच्या तपासात आता महत्त्वपूर्ण बदल झाल्याचे मानले जात आहे.
रात्री 7 वाजता कारमध्ये झाला होता स्फोट
10 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री सुमारे 7 वाजता लाल किल्ल्याजवळ हा स्फोट झाला होता. एका धावत्या ह्युंदाई i20 कारला अचानक आग लागून हा स्फोट झाला. तपास यंत्रणांनी उमर-ए-नबी याची कारचा चालक म्हणून ओळख पटवली होती. त्याने आत्मघाती बॉम्बर म्हणून हा हल्ला केल्याचा तपास यंत्रणांना संशय होता.
2014 मध्ये AQISची स्थापना
अल-कायदा इन द इंडियन सबकॉन्टिनेंट (AQIS) ही अल-कायदाची प्रादेशिक शाखा असून तिची स्थापना 2014 मध्ये करण्यात आली. दक्षिण आशियातील अल-कायदाच्या कारवायांचा विस्तार करण्याच्या उद्देशाने ही संघटना स्थापन करण्यात आली. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या काही भागांमध्ये संघटनेच्या कारवाया विस्तारण्याचा तिचा उद्देश असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रांच्या ताज्या मूल्यांकनात अल-कायदा तसेच इस्लामिक स्टेट (ISIL/Da’esh) यांच्या विविध प्रादेशिक शाखांच्या कारवाया आणि त्यांच्या क्षमतेबाबत व्यापक चिंताही व्यक्त करण्यात आली आहे.


























































